स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करा ! – पू. (सौ.) भावना शिंदे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यशाळेचे भावपूर्ण वातावरणात उद्घाटन

फोंडा (गोवा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदेशांतील साधकांच्या कार्यशाळेचा २१ जुलै २०२२ या दिवशी रामनाथी येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्याला पू. (सौ.) भावना शिंदे आणि पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या संतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो. सर्वस्वाचा त्याग करून पूर्णवेळ आध्यात्मिक संशोधन केंद्रात राहून साधना करणार्‍या साधकांकडून शिकण्याची एक चांगली संधी सर्वांना या कार्यशाळेत मिळणार आहे. या संधीचा शिबिरार्थींनी लाभ करून घ्यावा.’’

पू. (सौ.) भावना शिंदे

या कार्यशाळेमध्ये कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रिया, भारत, एशिया पॅसिफिक प्रदेश, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देश येथील साधक सहभागी झाले आहेत. पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर म्हणाल्या की, कार्यशाळेला उपस्थित एका साधकाला त्यांच्यातील भावामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सभागृहात आल्याची अनुभूती आली. सर्वांनाच त्यांची उपस्थिती जाणवली.