साधकांना अंतर्मुख करून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालणारे अन् अखंड भावावस्थेत असलेले सनातनचे ७५ वे समष्टी संतरत्न पू. रमानंद गौडा !

१. ‘प्रवास करत असलेली चारचाकी, म्हणजे धर्मरथच आहे’, या भावाने चारचाकीची काळजी घेणे

पू. रमानंद गौडा

१ अ. ‘पू. रमानंदअण्णा प्रवास करत असलेल्या चारचाकीला ते ‘धर्मरथ’ असे संबोधतात.

१ आ. दौर्‍यावर जायच्या आदल्या दिवशी रथाची (चारचाकीची) स्वच्छता करायला सांगणे आणि जायच्या दिवशी त्याची शुद्धी करून अन् दृष्ट काढून दौर्‍यावर जात असल्याने प्रवासात अडचण न येणे : मला देवाच्या कृपेने पू. रमानंदअण्णा प्रवास करत असलेला रथ (चारचाकी) चालवण्याची सेवा मिळाली. पू. अण्णा दौर्‍यावर जायच्या आदल्या दिवशी रथाची स्वच्छता करायला सांगतात आणि दुसर्‍या दिवशी रथाची शुद्धी करून अन् दृष्ट काढून दौर्‍यावर जायला निघतात. त्यामुळे प्रवासात अडचण येत नाही.

१ इ. ते दौर्‍यावर जात असतांना ‘रथात साधकांचे सर्व साहित्य कशा पद्धतीने ठेवता येईल आणि चांगली स्पंदने येण्यासाठी साहित्याची मांडणी कशा पद्धतीने करायला हवी ?’, हे बारकाव्यानिशी सांगतात.

श्री. सुकेश गुरव

१ ई. साधकाला रथ चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी मार्गदर्शन करणे : मी रथ चालवत असतांना ते मला ‘रथ चांगल्या प्रकारे कसा चालवायचा ? मार्गात वळण आणि घाट आल्यास रथ कसा चालवायचा ? रात्रीच्या वेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे आणि समोरून वाहने आल्यास त्यांना कशा पद्धतीने ‘फोकस’ किंवा लाईट वर-खाली (अपर-डीपर) करायचे ?’, असे अनेक बारकावे सांगतात.

१ उ. ‘लांबच्या प्रवासात साधकाला विश्रांती मिळावी’, यासाठी स्वतःला पाठीचा त्रास असूनही रथ चालवणे आणि ते रथ चालवत असतांना रथात एक वेगळेच चैतन्य आणि ऊर्जा जाणवणे : ‘साधकाला रथ चालवतांना झोप येत नाही ना ?’, याविषयी पू. अण्णा सतर्क असतात. साधकाला झोप येत असल्यास ते त्याला रथ बाजूला घ्यायला सांगून त्याला तोंड धुवायला आणि कापूर अन् अत्तर यांचे उपाय करायला सांगतात. पू. अण्णांना पाठदुखीचा त्रास असूनही ते लांबच्या प्रवासात ‘साधकाला विश्रांती मिळावी’, यासाठी स्वतः रथ चालवतात. पू. अण्णा रथ चालवतांना रथात एक वेगळेच चैतन्य आणि ऊर्जा जाणवते. ते रथ चालवत असतांना आणि मी रथ चालवत असतांना वातावरणातील भेद मला लगेच जाणवतो.

२. गुणवैशिष्ट्ये

२ अ. ‘साधकांची प्रगती लवकर व्हावी’, अशी तळमळ असणे

२ अ १. साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करणे : पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात. ते साधकांना सतत आनंदी आणि उत्साही ठेवतात.

२ अ २. साधकांनी केलेल्या नियोजनात त्रुटी असल्यास ‘साधकांकडून त्या त्रुटी पुन्हा होऊ नयेत’, यासाठी पू. रमानंदअण्णा साधकांना त्यावर दृष्टीकोन देतात.

२ आ. प्रत्येक कृती सात्त्विक होण्यासाठी प्रयत्न करणे

२ आ १. कलिंगडाच्या लहान फोडी खाण्यासाठी दिलेल्या ‘स्टिक्स’ (फळांच्या फोडी उचलण्याच्या टोकदार काड्या) परत करून चमच्याने फोडी खाणे : एकदा त्यांचे जेवण झाल्यानंतर मी त्यांना कलिंगडाच्या लहान फोडी आणि त्या खाण्यासाठी ‘स्टिक्स (फळांच्या फोडी उचलण्याच्या टोकदार काड्या) घेऊन गेलो. तेव्हा पू. अण्णा मला म्हणाले, ‘‘स्टिक्सने फळाला टोचून खायचे नसते. फळाला टोचले, तर त्यातून चांगली स्पंदने येणार नाहीत.’’ पू. अण्णांनी त्या स्टिक्स परत केल्या आणि मला चमचा आणायला सांगितला.

२ इ. भावाचे सगुण रूप

२ इ १. पू. रमानंद अण्णांमध्ये एवढा भाव आहे की, सर्व साधक त्यांच्या स्वागतासाठी आतुरलेले असतात. पू. अण्णा दिसताक्षणी साधकांच्या डोळ्यांत भावाश्रू येतात आणि पू. अण्णांचाही साधकांकडे पाहून भाव जागृत होतो.

२ इ २. साधकांच्या मनावर साधना करण्याचे महत्त्व भावपूर्णरित्या बिंबवणे : पू. अण्णा आदल्या दिवशी ‘साधकांचे उद्याचे नियोजन कसे असणार ?’, याचा आढावा घेऊन ‘साधकांनी अजून काय करणे अपेक्षित आहे ?’, याचे चिंतन त्यांना करायला सांगतात. पू. अण्णा साधकांच्या मनावर साधना करण्याचे महत्त्व अशा रितीने बिंबवतात, की ते ऐकतांना साधक आणि धर्मप्रेमी यांची भावजागृती होते. त्या वेळी सर्व साधक भावावस्था अनुभवतात आणि पू. अण्णांचीही भावजागृती होते.

२ इ ३. परात्पर गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव ! : पू. अण्णांचा परम पूज्यांप्रती इतका भाव आहे की, ते प्रत्येक मार्गदर्शनाच्या वेळी ‘हमारे गुरुदेवजी’, ‘हमारे गुरुजी’, ‘हमारे परम पूज्य डॉक्टर’, असे म्हणतात. ‘सबकुछ गुरु की आज्ञा से हो रहा है’, असे ते सारखे सांगतात. ‘परम पूज्य गुरुदेव’, असे म्हटल्यावरही त्यांचा भाव जागृत होतो.

३. प्रार्थना

‘पू. अण्णा, ‘आम्हाला सतत तुमच्या सान्निध्यात ठेवा. साधकांना तुमचे मार्गदर्शन अखंड मिळू दे. या घनघोर आपत्काळात आमच्यातील स्वभावदोष आणि अहं याचा लय होऊन गुरुदेवांनी सांगितलेल्या शिखरापर्यंत आम्हाला घेऊन चला’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– श्री. सुकेश गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक