नूपुर शर्मा यांच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती

नवी देहली – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानावरून त्यांच्या विरोधात देशातील ९ पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हे सर्व गुन्हे देहलीत वर्ग करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने १० ऑगस्टर्पंत अटकेला स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी १० ऑगस्ट या दिवशी होणार आहे. याआधीही शर्मा यांनी १ जुलैला अशीच याचिका प्रविष्ट केली होती; परंतु न्यायालयाने ती ऐकण्यास नकार दिला होता. न्यायालयाने म्हटले होते, ‘‘तुमच्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. तुम्ही विलंबाने क्षमा मागितली, तीही ‘कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी ते विधान मागे घेत आहे’, या अटीवर मागितली. तुम्ही राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर येऊन संपूर्ण देशाची क्षमा मागितली पाहिजे.’’