पतियाळा (पंजाब) येथील कालीमाता मंदिराच्या भिंतीवर चिटकवण्यात आले खलिस्तानच्या समर्थनाचे भित्तीपत्रक !

पोलिसांची सुरक्षा असतांनाही घडला प्रकार !

पतियाळा (पंजाब) – येथील कालीमाता मंदिराच्या भिंतीवर अज्ञातांनी खलिस्तानच्या समर्थनाचे भित्तीपत्रक चिटकवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी हे भित्तीपत्रक फाडून टाकले. राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भित्तीपत्रक लावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. २९ एप्रिल २०२२ या दिवशी खलिस्तान समर्थकांनी याच मंदिरात घुसून हिंदु भाविकांना मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षेत वाढ केली होती. पोलिसांची आणि अर्धसैनिक दलाची सुरक्षा असतांनाही आता मंदिराच्या भिंतीवर हे भित्तीपत्रक चिटकवण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

१. या घटनेनंतर ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा विदेशात असणारा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्याने ‘भित्तीपत्रक लावणार्‍यांनी चांगले कार्य केले आहे’, असे म्हटले आहे.

२. ३० जून २०२२ या दिवशी राज्यातील जालंधर येथील ‘पंजाब आर्म्ड पोलीस मुख्यालया’च्या भिंतीवर खलिस्तान समर्थकांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा दिनांक लिहिला होता, तसेच ‘२६ जानेवारी या दिवशी पंजाब स्वतंत्र होईल’, असे लिहिले होते. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ म्हणजे वर्ष १९८४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई आहे.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. याकडे केंद्र सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर उपाययोजना काढणे आवाश्यक आहे !
  • पोलिसांची सुरक्षा असतांनाही असे कृत्य करण्याचे धाडस केले, तेव्हा पोलीस झोपलेले होते का ? अशी घटना पोलिसांना आणि पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला लज्जास्पद !