कॅनडामध्ये शीख नेत्याची गोळ्या झाडून हत्या

मारेकर्‍यांनी स्वतःची चारचाकी गाडीही जाळली !

प्रतीकात्मक छायाचित्र

ओटावा (कॅनडा) – वर्ष १९८५ च्या ‘कनिष्क’ या एअर इंडियाच्या विमानात बाँबस्फोट केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले आरोपी रिपुदमन सिंंह मलिक या शीख नेत्याची १४ जुलैच्या रात्री कॅनडातील वैंकुवर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मारेकरी चारचाकी गाडीतून आले होते. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतःची गाडी जाळून टाकली. रिपुदमन खालसा हे ‘क्रेडिट युनियन’, तसेच कॅनडातील ‘सतनाम एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष होते, तसेच ते खालसा शाळा चालवत होते.

१. रिपुदमन हे आधी खलिस्तान चळवळीचे समर्थक होते; पण नंतर त्यांची विचारसरणी पालटली. शेवटच्या क्षणापर्यंत ते शीख समाजातील लोकांना फुटीरतावादी नेत्यांपासून दूर रहाण्यास सांगत होते. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते. शीख समुदायासाठी उचललेल्या पावलांसाठी रिपुदमन यांनी मोदी सरकारचे आभार मानले होते. मोदी यांचे कौतुक केल्यामुळे मलिक यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

२. रिपुदमन यांनी गुरुग्रंथ साहिबची छपाई केली होती. यामुळे कॅनडातील शिखांनी त्यांना विरोध केला होता. हे प्रकरण अकाल तख्त साहिबकडे पोचल्यावर रिपुदमन यांनी छपाई बंद केली आणि सर्व प्रती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी यांना सोपवल्या. गुरुग्रंथ साहिबची छपाई कुणी स्वतःहून करू शकत नाही. याची छपाई केवळ अमृतसर आणि देहली येथेच होते. या प्रकरणातूनही त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.