हे काँग्रेसचे आतंकवादविरोधी धोरण आहे का ? – भाजप

काँग्रेसच्या सत्ताकाळात पाकच्या पत्रकाराने भारत सरकारची गोपनीय माहिती ‘आयएस्आय’ला पुरवल्याचे प्रकरण

चारित्र्यहननाचा प्रयत्न ! – काँग्रेस

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया

नवी देहली – भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या आमंत्रणावरून मी भारताचे दौरे केले. त्या वेळी मला अनेक गोपनीय कागदपत्रे पहायला मिळाली. ही सर्व माहिती मी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’ला दिल्याचा दावा पाकिस्तानातील पत्रकार नुसरत मिर्झा याने काही दिवसांपूर्वी केल्याने तत्कालीन उपराष्ट्रपती हामिद अन्सारी वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. भाजपने ‘या प्रश्‍नावर अन्सारी आणि काँग्रेस यांनी खुलासा करावा’, अशी मागणी केली आहे.

‘तुम्ही देशाचा विश्‍वासघात कसा करता ? सोनिया गांधी, राहुल गांधी आणि हामिद अन्सारी यांनी समोर येऊन यावर खुलासा करायला हवा. एखादी व्यक्ती गोपनीय माहिती आयएस्आयला देत असतांना त्यालाच भारतभेटीचे निमंत्रण देण्यात येते, हे काँग्रेसचे आतंकवादविरोधी धोरण आहे का ?’, असे प्रश्‍न भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी उपस्थित केले.

काँग्रेसने भाजपच्या सर्व आरोपांचा निषेध केला असून ‘चारित्र्यहननाचा हा सर्वांत वाईट प्रकार आहे’, असे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे.

परिषदेत कुणाला बोलावले, ही गोष्ट आयोजकांनाच (केंद्र सरकारलाच) ठाऊक होती ! – हामिद अन्सारी

जर अन्सारी सत्य बोलत असतील, तर ‘तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वत:हून गोपनीय सरकारी माहिती शत्रुराष्ट्र पाकच्या पत्रकाराला दिली’, असाच याचा सरळ सरळ अर्थ होतो. यामुळे काँग्रेसच्या संबंधित नेत्यांचे अन्वेषण करून त्यांना या राष्ट्रघातकी कृत्यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमी नागरिकांना वाटते !

हामिद अन्सारी यांनी ‘परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून शिफारस करण्यात येणार्‍या परदेशी शिष्टमंडळांनाच उपराष्ट्रपती निमंत्रित करतात. हे सर्वज्ञात वास्तव आहे. मी आतंकवादावरील एका परिषदेचे उद्घाटन केले होते. त्या परिषदेमध्ये कोण सहभागी झाले होते, ही गोष्ट आयोजकांनाच ठाऊक होती’, असे म्हणत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मी कटीबद्ध आहे,’ असे स्पष्टीकरणही अन्सारी यांनी दिले.