‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल’ला ५१ कोटी ७२ लाख रुपये, तर मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना १० कोटी रुपयांचा दंड

  • परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

  • अनुमती नसतांना निधी स्वीकारल्याचा ठपका

‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड’ आस्थापना चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल

नवी देहली – ‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड’ हे आस्थापन आणि त्याचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आकार पटेल यांना परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अनुक्रमे ५१ कोटी ७२ लाख आणि १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने दिली.

‘ब्रिटनमधील ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने भारतातील तिच्या स्वयंसेवी संस्थांच्या  विस्तारकार्यासाठी ‘विदेशी साहाय्य नियमन कायद्या’च्या कचाट्यात न सापडता थेट परकीय गुंतवणुकीच्या मार्गाने ‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल’ला प्रचंड रक्कम पाठवली’, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाला मिळाली होती.

भारताच्या गृह मंत्रालयाने ‘अ‍ॅम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल फाऊंडेशन ट्रस्ट’ला  ‘विदेशी साहाय्य नियमन कायद्या’च्या अंतर्गत कुठलाही विदेशी निधी स्वीकारण्याची अनुमती नव्हती. तरीही या संस्थेने निधी स्वीकारला, असे अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले.

संपादकीय भूमिका

अनुमती नसतांना विदेशी निधी स्वीकारणार्‍या स्वयंसेवी संस्थांवर सरकार बंदी का घालत नाही ?