आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा ! – पुतिन यांचे पाश्‍चात्त्य देशांना आव्हान

मॉस्को – आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्‍चात्त्य देशांना आव्हान दिले. मागील ४ मासांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. अनेक पाश्‍चात्त्य देशांनी स्वतः युद्धात सहभागी न होता युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी, ‘युक्रेनला पाठिंबा द्यायचा असेल, तर थेट आमच्या विरोधात रणांगणात उतरा’, असे आव्हान दिले आहे.

पुतिन यांनी ७ जुलै या दिवशी मॉस्को येथे खासदारांची एक बैठक घेतली. त्यात  युद्धाचा आढावा घेण्यात आला. पुतिन यांनी युक्रेनच्या जनतेप्रती संवेदनाही दाखवली. ते म्हणाले, ‘‘पाश्‍चात्त्य देश स्वतः युद्धात सहभागी न होता युक्रेनच्या जनतेला लढण्यासाठी पुढे करत आहेत. आमचा शांततेला विरोध नाही; पण काही देशांच्या हस्तक्षेपामुळे शांतता प्रस्थापित करणे अवघड होत असल्याचे लक्षात घ्यावे.’’