५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. सिया संदीप वाळुंज (वय ३ वर्षे) !

चि. सिया संदीप वाळुंज

१. त्र्यंबकेश्वरला जाऊन ‘नारायण नागबली’ आणि ‘त्रिपिंडी श्राद्ध’ हे विधी केल्यावर गरोदर रहाणे : मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले. गरोदर रहाण्यापूर्वी मला घरच्यांनी ‘त्र्यंबकेश्वरला जाऊन विधी करून या’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही नाशिक येथे जाऊन नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध हे विधी केले अन् त्यानंतर काही मासांत मी गरोदर राहिले. ‘गर्भधारणेच्या आधी श्राद्धविधी होणे’, हे देवाचेच नियोजन होते.

२. गर्भारपण

२ अ. ‘बाळ श्रीकृष्णाच्या स्वाधीन आहे’, असे वाटून भाव जागृत होणे : गरोदर असल्यापासून ‘हे बाळ श्रीकृष्णाच्या स्वाधीन आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी माझा भाव जागृत होऊन श्री गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होत असे. ‘माझ्या पोटी जन्माला येणारे बाळ हे श्रीकृष्णाचे रूप असू दे आणि ते सात्त्विक असू दे’, असे मला नेहमी वाटायचे.

२ आ. पहिले ६ मास कोणताही शारीरिक त्रास न होणे : मला खाण्यापिण्याची कोणतीच विशेष आवड नव्हती. गोड, तिखट सर्व काही मला आवडत होते. पहिले ६ मास मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.

२ इ. सातव्या मासानंतर झालेले त्रास : ७ व्या मासात मी आणि यजमान भारतात आल्यानंतर रुग्णालयात गेलो. आधुनिक वैद्यांकडे प्रथमच गेल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘बाळाचे वजन अल्प आहे. बाळाला आवश्यक ते घटक मिळत नसल्यामुळे तुमची प्रसुती लवकर होऊ शकते.’’

२ इ १. आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगितल्यावर नामजपादी उपाय वाढवण्यावर भर देणे आणि खोलीत सतत उपाय केल्याने डॉक्टर, तसेच परिचारिका यांना खोलीत प्रवेश करताक्षणीच प्रसन्न वाटू लागणे : तिसऱ्या वेळी नेहमीच्या तपासणीसाठी (‘फॉलो अप’साठी) रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्यांनी मला लगेच रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. तेव्हा माझे वडील ‘डेंग्यू’ने आजारी असल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात भरती केले होते. त्यामुळे घरातील सर्वांचा ताण वाढला होता. अशा परिस्थितीतही मी लगेच रुग्णालयात भरती झाले. त्या वेळी आम्ही नामजपादी उपाय वाढवण्यावर भर दिला. भ्रमणभाषवर भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवणे, सनातनच्या उदबत्तीने खोलीची शुद्धी करणे आणि उदबत्ती सतत लावून ठेवणे आदी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सतत केल्याने डॉक्टर आणि परिचारिका यांना खोलीत प्रवेश करताक्षणीच प्रसन्न वाटू लागले. त्यांनी स्वतःहून ‘सनातनची उत्पादने आम्हाला मिळतील का ?’, अशी विचारणा केली. अशा प्रकारे ‘देवानेच आमच्याकडून समष्टी सेवा करून घेतली’, याबद्दल कृतज्ञता वाटून ‘आता देवच आपली काळजी घेणार आहे’, असे मला वाटू लागले.

३. अकस्मात् शारीरिक त्रास चालू झाल्याने आधुनिक वैद्यांनी ‘लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल’, असे सांगणे, त्या वेळी ‘प.पू. गुरुदेवच शस्त्रक्रिया करणार आहेत’, असा भाव ठेवणे : एकदा रुग्णालयात मी आणि यजमान दोघेच असतांना मला अकस्मात् शारीरिक त्रास चालू झाला. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी ‘लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल’, असे सांगितले. त्या वेळी मला ३६ वा आठवडा चालू होता. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. त्याच क्षणी माझ्याकडून ‘प.पू. गुरुदेवच माझी शस्त्रक्रिया करणार आहेत’, असा भाव ठेवला गेला. ‘देवच माझी काळजी घेणार आहे’, असे म्हणून सर्व देवावर सोपवून मी ‘श्री गुरुदेव दत्त’, असा नामजप चालू केला.

४. बाळाचा जन्म : बाळाचा जन्म झाल्यावर त्याची शारीरिक हालचाल पाहून वजन अल्प असतांनाही बाळाला ‘एन्.आय.सी.यु. (न्यू बॉर्न इन्टेन्सिव केअर युनिट)’ मध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

४ अ. जन्म ते ३ मास

अ. जन्मानंतर बाळाची दृष्टी एकदम स्थिर होती. बाळ आवाजाच्या दिशेने लगेच पहात होते.

आ. बाळाचे वजन २ किलो होण्याआधीच आम्हाला रुग्णालयातून सोडण्यात आले. अपुऱ्या दिवसांत जन्माला आलेल्या या बाळाची विशेष काळजी घ्यायला देवानेच आम्हाला शिकवले. बाळाचे वजन अपेक्षित अशा प्रमाणात वाढत होते आणि ‘बाळाने योग्य वेळी प्रगतीचे टप्पे गाठले’, ही गुरुमाऊलींची आमच्यावर झालेली कृपाच होती.

इ. बाळाचा जन्म मार्गशीर्ष मासात झाला. त्यामुळे ‘बाळाचे नाव देवीच्या नावावरून ठेवावे’, असे मला वाटत होते आणि मला ‘सिया’ हे नाव सुचले. ‘सिया’ हे सीतामैयाचे दुसरे नाव आहे.

४ आ. वय – ४ ते १ वर्ष

१. सियाला दूध देतांना श्रीकृष्णाचा नामजप केल्यावरच ती दूध प्यायची. त्यामुळे घरात यजमान आणि सासूबाईं यांना नामजप करण्याची सवय लागली.

२. ती ६ – ७ मासांची झाल्यावर दूध पितांना हाताच्या बोटांची मुद्रा करू लागली.

३. भ्रमणभाषवर नामजप आणि स्तोत्रे लावली की, सिया ती एकाग्रतेने ऐकत असे अन् हुंकार देत असे.

४. सिया ८ मासांची असतांना गळ्यातील श्रीराम आणि हनुमान यांचे पदक हातात धरून त्याकडे एकटक पहात असे.

५. आमच्या घरात सनातन संस्थेने प्रकाशित केलेले श्रीकृष्णाचे मोठे चित्र आहे. त्या चित्राकडे ती एकटक पहात असे.

४ इ. वय – १ ते ३ वर्षे

४ इ १. आनंदी : सिया सतत आनंदी असते. ती झोपेतून नेहमी हसत उठते. ती लहान लहान गोष्टींमुळेही आनंदी होते.

४ इ २. जिज्ञासा आणि उत्साही : तिचे निरीक्षण उत्तम आहे. तिला प्रत्येक नवीन गोष्टीची जिज्ञासा असते. घरात काही नवीन वस्तू दिसली की, ती त्याविषयी जिज्ञासेने विचारते. एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा तिला पुष्कळ उत्साह असतो. तिला व्यायाम करायलाही आवडते.

४ इ ३. धीटपणा : एकदा आम्ही प्राणीसंग्रहालयात गेलो होतो. तिथे तिने कबुतर, सापाचे पिल्लू आणि वाघाचा बछडा यांना न घाबरता प्रेमाने आपल्या हातात घेतले होते.

४ इ ४. प्रेमभाव : मला किंवा तिच्या बाबांना कुठे दुखत असेल, तर ती लगेच त्यावर फुंकर घालते आणि ‘मी तुम्हाला औषध लावते’, असे म्हणते.

४ इ ५. उत्तम आकलनक्षमता : सियाला एखादी गोष्ट शिकवली की, तिला पुन्हा सांगावे लागत नाही. तिला ते लगेच समजते. एकदा मी खडेमीठ पाण्यात घालून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत होते. तेव्हा तीसुद्धा तिची खेळण्यातील आसंदी आणि बालदी घेऊन माझ्यासमवेत उपाय करायला बसली. घरातून बाहेर पडतांना तोंडाला ‘मास्क’ लावण्याची ती स्वतःहून मला आठवण करून देते आणि घरी आल्यावरच ‘मास्क’ काढते.

४ इ ६. धर्माचरणाची आवड : सियाला प्रतिदिन आंघोळ झाल्यावर कुंकू लावायला आवडते. तिला ‘पॅन्ट’पेक्षा फ्रॅाक आणि ‘स्कर्ट’ घालायला आवडतो. तिला साडी नेसायला आणि बांगड्या घालायलाही आवडतात.

४ इ ७. नामजपादी उपाय करायला आवडणे : ती माझ्यासमवेत घराची शुद्धी करते. मोरपिसाने स्वतःवरचे आवरण काढते, तसेच कापूर आणि अत्तर यांचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय आवडीने करते. ती माझ्यासमवेत नामजप करायलाही बसते.

४ इ ८. परिस्थितीशी जुळवून घेणे : कोरोना महामारीच्या काळात ६ मासांत ती एकदाही दाराबाहेर गेली नाही किंवा तिने बाहेर जाण्याचा हट्टही केला नाही.

५. स्वभावदोष : काही गोष्टींत हट्टीपणा करणे

‘हे ईश्वरा, तुझ्याच कृपेने आम्हाला सियासारखी मुलगी मिळाली. ‘तिचा सांभाळ कसा करायचा ? तिला उत्तम साधक कसे घडवायचे ?’, हे आमच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. ‘तुला अपेक्षित असे सर्व प्रयत्न आमच्याकडून करवून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सोनाली संदीप वाळुंज (सियाची आई), एशिया पॅसिफिक (१०.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक