इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रदूषणकारी !

‘इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक नाहीत’, असे एका संशोधनाच्या निष्कर्षातून नुकतेच समोर आले आहे. ‘इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक का नाहीत ?’, यामागील कारणांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१. औष्णिक विद्युत् केंद्रामुळे परिसरातील तापमान २ ते ३ डिग्री सेल्सिअस वाढणे

भारतातील बहुतेक औष्णिक ऊर्जा प्रकल्प जुन्या तंत्रज्ञानावर आधारित उपनिर्णायक बाष्पक (सब-क्रिटिकल बॉयलर) वापरतात. (ज्यात २२५ किलो/सेंमी २ हून अल्प दाब असतो.) त्यामुळे त्यांची कमाल औष्णिक कार्यक्षमता अनुमाने २० ते ३० टक्के एवढी आहे. (बॉयलर औष्णिक कार्यक्षमता, म्हणजे १ किलो कोळसा जाळण्याने निर्माण होणारी किती ऊर्जा विजेमध्ये रूपांतरित होते) थोडक्यात कोळसा जाळल्याने निर्माण होणारी ७० ते ८० टक्के ऊर्जा कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणीच वातावरणामध्ये मिसळते. (ही ऊर्जा उच्च तापमानाच्या धुरातून, बाष्पकातून हवेत होणार्‍या उष्णतेच्या उत्सर्जनातून, गरम राखेतून आणि जनित्र/टर्बाईनमधून बाहेर पडणारी वाफ अन् पाणी इत्यादीतून वातावरणात सोडली जाते.) या कारणामुळे औष्णिक विद्युत् केंद्राजवळील वातावरणाचे तापमान हे लगतच्या परिसरातील तापमानाहून २ ते ३ डिग्री सेल्सिअस अधिक असते.

२. भारतात औष्णिक केंद्रात ‘बिटुमिनस’ कोळशाचा वापर होत असल्याने बॉयलरची औष्णिक कार्यक्षमता अल्प होणे

अल्प उष्णतेच्या कार्यक्षमतेचे आणखी एक कारण, म्हणजे भारतात ‘बिटुमिनस’ (डांबरासारखा पदार्थ असलेला कोळश्याचा एक प्रकार) किंवा ‘सब बिटुमिनस’ (३५ ते ४५ टक्के कार्बन असलेला कमी दर्जाचा कोळसा) कोळशाचे उत्पादन केले जाते. हा कोळसा बॉयलरमध्ये वापरला जातो. ज्यामध्ये राख अधिक असते आणि त्याचे उष्मांक मूल्य अल्प असते. (१ किलो इंधनाच्या पूर्ण ज्वलनानंतर निर्माण होणारी ऊर्जा. कोळशातील हायड्रोकार्बन जळतो आणि ऊर्जा निर्माण करतो. अधिक राख असेल, तर परिणामी अल्प हायड्रोकार्बन जळतो आणि त्यामुळे अल्प ऊर्जानिर्मिती होईल, तसेच जी काही ऊर्जा निर्माण होईल, तिचा वापर खोलीच्या तापमानापासून ते १ सहस्र डिग्री सेल्सिअस उच्च तापमानापर्यंत राख गरम करण्यासाठी केला जातो. त्याचा व्यावहारिकदृष्ट्या काही उपयोग होत नाही.) हे सर्व घटक बॉयलरची औष्णिक कार्यक्षमता अल्प करतात. भारतात सामान्यत: ११/३३ केव्ही किंवा त्याहून अधिक केव्ही तारांच्या माध्यमातून विजेचे वहन केले जाते आणि त्यात अनुमाने ५ टक्के वीज वाया जाते.

३. एक किलो कोळसा जाळल्यानंतर त्यातून निर्माण होणार्‍या ऊर्जेतून केवळ १२६.९ ग्रॅम ऊर्जा इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी वापरली जाणे

सामान्यत: आपल्याकडे वीज वितरण प्रणाली अतिशय खराब आहे आणि वितरण तोटा १५ ते ७० टक्के इतका आहे. आपण ३० टक्क्यांच्या सरासरी वितरण तोट्याचा विचार करूया. (महावितरण सरासरी ३० टक्के वितरण तोटा मानते.) मग भिन्नदिक प्रवाहातून (एसी पॉवर सप्लाय) एकदिक प्रवाहामध्ये (डिसी पॉवर सप्लाय) रूपांतरित करण्यात अनुमाने ५ टक्के वीज वाया जाते.

अनुमाने १० टक्के वीज ही वीजघट किंवा वीज थंड होण्यासाठी वापरतात. (चार्जिंग आणि डिस्चार्ज करतांना विजेर्‍या गरम होतात. त्या थंड करणे आवश्यक असते, अन्यथा त्यांचा स्फोट होऊ शकतो.) बॅटरीची सरासरी कार्यक्षमता अनुमाने ८० टक्के असते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या कुंचलाविरहित एकदिक प्रवाही चलित्राची (ब्रशलेस डायरेक्ट करंट मोटर्स) सरासरी कार्यक्षमता ९५ टक्के असते. जर आपण वरील सर्व घटकांचा विचार केला, तर अंतिमत: ही कार्यक्षमता अल्प असेल. ३० टक्के x ९५ टक्के x ७० टक्के x ९५ टक्के x ९० टक्के x ८० टक्के x ९५ टक्के = १२.९६ टक्के. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही १ किलो कोळसा जाळता, तेव्हा त्या कोळशाच्या ऊर्जेपैकी केवळ १२६.९ ग्रॅम ऊर्जा इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी वापरली जाते.

४. इलेक्ट्रिक वाहनापेक्षा ‘बी.एस्. व्ही.आय.’ (भारत सरकारद्वारे स्थापित उत्सर्जन मानक) डिझेलवर चालणारी वाहने वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित !

आता ‘बी.एस्.व्ही.आय.’ डिझेल वाहनांचा विचार करूया. ‘बी.एस्.व्ही.आय.’ डिझेल इंजिनची सरासरी थर्मल कार्यक्षमता ४० टक्के आहे, जी मोटारमधून मिळणार्‍या ऊर्जेच्या बरोबरीची असते. त्यामुळे जेव्हा आपण १ लिटर डिझेल जाळतो, तेव्हा त्या डिझेलमधील ४०० मिलीमीटर डिझेलची ऊर्जा तुमचे वाहन चालवण्यासाठी वापरली जाते. जेव्हा तुम्ही वरील दोन्हींची तुलना करता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, इलेक्ट्रिक वाहनापेक्षा ‘बी.एस्.व्ही.आय.’ डिझेल इंजिन वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहे.

वरील तुलनेत लिथियम आयर्न विजेर्‍या (बॅटर्‍या) बनवण्यासाठी वापरण्यात येणारे धातू आणि त्यामुळे होणारे प्रदूषण इत्यादींचा विचार केलेला नाही किंवा सौरघटाच्या (‘सोलर बॅटरी’च्या) संदर्भात २० वर्षांच्या आयुष्यानंतर त्यांचा सध्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुनर्वापर करता येत नाही. (भविष्यात शास्त्रज्ञ त्यांचा पुनर्वापर करण्याचे मार्ग आणि साधने शोधू शकतील.) हवेवर चालणार्‍या जनित्राच्या पात्यांचे (विंड टर्बाइन ब्लेड) उपयुक्त आयुष्य २० ते २५ वर्षांचे असते. ते संपल्यानंतर त्या पात्यांचा सहजासहजी पुनर्वापर करता येत नाही.

५. जीवाश्म इंधनावर चालणार्‍या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांमुळे अधिक प्रदूषण होणे

थोडक्यात जीवाश्म इंधन (बायो फ्युएल) आणि त्यांचा वापर करून चालणारी वाहने विजेवर चालणार्‍या वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या नवीन तंत्रज्ञानापेक्षा अल्प प्रदूषणकारी आहेत. त्यामुळे भारतात लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यापासून परावृत्त केले पाहिजे; कारण त्यांचा वापर करून आपण अधिक प्रदूषण करत आहोत. (या वाहनांच्या वापरामुळे वापरकर्त्यांच्या शहराऐवजी वीजनिर्मिती प्रकल्पांच्या शहरांमध्ये प्रदूषण होत आहे.) त्याचा आपल्या भावी पिढ्यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

– चंद्रशेखर जोशी, सनदी यंत्र अभियंता

(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’)