मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर – अजून खातेवाटपाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ जुलै या दिवशी येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथे आगमन झाल्यावर त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी विदर्भातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने विमानतळावर गर्दी केली होती.

ते पुढे म्हणाले की, १८ जुलै या दिवशी चालू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ स्थापन करण्याचा प्रयत्न राहील. ११ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयात शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल. नागपूरकरांनी माझ्यावर प्रेम केले. आमदार म्हणून निवडून दिले. माझे स्वागत केल्याविषयी त्यांचे आभार ! आमच्यावर मोठे दायित्व असून ते पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.