एकनाथ शिंदे सरकारने विश्‍वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकला !

एकनाथ शिंदे सरकारने विश्‍वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा बहुमताने जिंकला !

मुंबई – भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार यांनी अन्य छोटे राजकीय पक्ष अन् अपक्ष आमदार यांच्या पाठिंब्याने ४ जुलै या दिवशी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमताचा आकडा पार केला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकूण १६४ मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. महाविकास आघाडीचा ६५ मतांनी पराभव करून भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक गटाने सत्ता स्थापनेसाठीचे बहुमत सिद्ध केले.

१. समाजवादी पक्षाचे अबू आझमी, रईस शेख आणि एम्.आय्.एम्. पक्षाचे आमदार फारूख अन्वर शाह हे तटस्थ राहिले. सुनील प्रभु यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्याचा, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी भाजप आणि शिंदे गटाला मतदान करण्याचा पक्षादेश काढला होता.

२. सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. प्रथम अध्यक्षांनी तालिका सभापती (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाम पहाणारे प्रतिनिधी) म्हणून आशिष शेलार, चेतन तुपे, संग्राम थोपटे, योगेश सागर आणि संजय शिरसाट यांच्या नावाची घोषणा केली.

३. त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मंत्रीमंडळाच्या बहुमताचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भरतशेठ गोगावले यांनी अनुमोदन दिले. या वेळी महाविकास आघाडीकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतदानासाठी टाकला.

महाविकास आघाडीचे मतदान ८ मतांनी घटले !

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना १०७ मते मिळाली होती; परंतु बहुमताच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे काही आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे बहुमताच्या चाचणीच्या वेळी महाविकास आघाडीची ८ मते घटली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या १६ आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता; मात्र बहुमताच्या निवडणुकीच्या वेळी संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे एक मत घटले.

क्षणचित्र

भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांनी बहुमताचा आकडा पार केल्यावर विजयी गटाच्या आमदारांनी सभागृहात ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विजय असो’, ‘जय श्रीराम ।’ अशा घोषणा दिल्या.