सोलापूर, २ जुलै (वार्ता.) – वाळू ठेक्याची समयमर्यादा ९ जून या दिवशी संपूनही मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर येथे वाळूचा उपसा चालू आहे. आजही त्या ठिकाणी पाण्यातून बोट आणि जेसीबी यांच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने नदीमध्ये २० ते २५ फूट खड्डे पडले आहेत. यासंदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही वाळू माफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने १८ जुलै या दिवशी मुंबई येथील मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहे, अशी चेतावणी सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी गणेश चव्हाण म्हणाले की,
१. घोडेश्वर येथे ‘प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर’ या आस्थापनाला १५ सहस्र ब्रास वाळू उपसा करण्यासाठी ठेका देण्यात आला होता. या ठिकाणी लाखो ब्रास वाळू उपसा अद्यापही रात्रंदिवस चालू आहे. याविषयीचे चित्रीकरण मी शासनाला दिले आहे; मात्र तरीही प्रशासन अवैध उपसा करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नाही.
२. भीमा नदीपात्रातील वाळू लिलावाच्या नकला आणि प्रशासनाने वाळूच्या ठिकाणी बसवलेले ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण यांची मागणी अर्जाद्वारे केली असता ते देण्यास सर्व अधिकारी अन् तहसीलदार टाळाटाळ करत आहेत. याचा अर्थ वाळू ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. अवैध वाळू उपसामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? |