भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

पुष्कळ वर्षे साधना करूनही उन्नती न झालेल्या साधकांनी, तसेच स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकांनी स्वतःचे निरीक्षण केले, तर लक्षात येईल की, साधनेच्या आरंभी जसा सहजतेने भाव जागृत होत होता, तसा आता होत नाही. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉक्टर यांचे छायाचित्र किंवा देवतेचे चित्र पाहिले की, लगेच हात जोडले जायचे आणि त्यांना प्रार्थना व्हायची; पण आता तसे होत नाही. पूर्वी नामजप करायची आठवण होत होती; पण आता होत नाही. दायित्व घेऊन सेवा करू लागल्याने ‘आपल्याला सर्व जमू लागले’, असे वाटते. त्यामुळे देवाचे साहाय्य न घेतल्याने सेवा भावपूर्ण होत नाही. थोडक्यात काय, तर आपल्यात भावाचा अभाव झाला आहे. भावाचा अभाव असल्याने आपला अहं वाढला आहे आणि आपल्याकडून चुका होत आहेत.

सतत भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न केल्यासच आपण ताळ्यावर राहू शकतो. गुरु आणि गुरुसेवा यांप्रती भाव असेल, तरच आपल्यावर गुरुकृपा होईल. आपल्यात कर्तेपणा येणार नाही आणि आपल्याकडून चुकाही होणार नाहीत. त्यामुळे साधनेच्या आरंभी आपण जसे भावजागृतीचे प्रयत्न करत होतो, तसेच प्रयत्न पुढेही चालू ठेवणे पुढील उन्नतीसाठी आवश्यक आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)