पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाची दुर्दशा; वाड्याच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली !

 

हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळावरील प्रवेशद्वाराची भिंत

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – राष्ट्रीय स्मारक असलेल्या हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळावरील प्रवेशद्वाराची भिंत २७ जून या दिवशी पावसाने कोसळली, तसेच उर्वरित प्रवेशद्वार केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. २ वर्षांपूर्वी प्रवेशद्वाराच्या भिंतीचा काही भाग पडला होता. त्या वेळी या भिंतीची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र पुरातत्व विभाग आणि नगर परिषद यांनी याकडे दुर्लक्ष केले. (अशी मागणी का करावी लागते ? तसेच केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष का करण्यात येते ? यासाठी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक) राजगुरु यांच्या जन्मस्थळाला पर्यटक, अभ्यासक, शालेय विद्यार्थी, नागरिक यांची नेहमी गर्दी असते. या भिंतीची तात्काळ डागडुजी करावी, अशी मागणी ‘हुतात्मा राजगुरु समिती’चे अध्यक्ष अतुल देशमुख, विठ्ठल पाचारणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

राजगुरूंचे जन्मस्थळ असलेल्या ‘थोरला वाड्या’चे बांधकाम पुरातत्व खात्याने पूर्ण केले. मात्र वाड्यात हुतात्मा राजगुरूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारणे, जीवनकार्याची माहिती देणारा लघुपट दाखवणे, पुतळे आणि शिल्पे उभारणे, संग्रहालय उभारणे आदी अनेक गोष्टी प्रस्तावित आहेत. निधीअभावी सर्व कामे रखडली असून यातून प्रशासकीय अनास्था अधोरेखित होते.

संपादकीय भूमिका

  • क्रांतीकारकांची स्मृतीस्थळे आणि गडदुर्ग यांचे संरक्षण केल्याने जनतेच्या मनात इतिहास जागृत राहतो.
  • ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले, त्या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे !