१. रथोत्सव चालू होण्याआधी तीनही गुरु रथात स्थानापन्न झाल्याचे दिसणे आणि प्रत्यक्षातही ते तशाच पद्धतीने स्थानापन्न झालेले असणे
रथोत्सव चालू होण्यापूर्वी ‘रथात मधोमध परात्पर गुरुदेव श्रीविष्णुस्वरूपात, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ त्यांच्या उजव्या आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ डाव्या बाजूला बसल्या आहेत’, असे दिसत होते. (‘प्रत्यक्षातही तीन गुरु (परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) अशाच पद्धतीने रथामध्ये स्थानापन्न झाले होते.’ – संकलक)
२. रथोत्सवात सर्व देवता, ऋषिमुनी आणि प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे दिसणे अन् त्यांनी पुष्पवृष्टी करणे
रथोत्सव चालू झाल्यावर ‘त्या ठिकाणी सूक्ष्मातून श्रीविष्णु, शिव, ब्रह्मा, श्रीकृष्ण, श्रीराम, यांसह स्वर्गातील देवता; श्री महालक्ष्मी आणि सप्तर्षी यांच्यासह अनेक ऋषिमुनी अन् प.पू. भक्तराज महाराज उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. त्या सर्वांनी सूक्ष्मातून पुष्पवृष्टी केली, तसेच देवतांनी शंखनाद केला.
३. रथामध्ये आरूढ झालेल्या परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर श्रीविष्णूचे दर्शन होऊन डोळ्यांतून सतत भावाश्रू येणे
रथामध्ये आरूढ झालेल्या परात्पर गुरुदेवांना बघून मला ‘प्रत्यक्ष श्रीविष्णूचे दर्शन झाले’, असे वाटले. एरव्ही परात्पर गुरुदेवांना बघितल्यावर नेहमी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांमध्ये भावाश्रू यायचे आणि माझा कंठ दाटून यायचा; पण या वेळी माझ्या डोळ्यांतून इतके भावाश्रू येत होते की, ते मला थांबवता येत नव्हते.
४. परात्पर गुरुदेवांना पाहून साधकांचा भाव जागृत होऊन त्यांच्या आनंदात वाढ होणे आणि परात्पर गुरुदेवांच्या संदर्भातही असेच घडणे
या वेळी मला जाणवले, ‘परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून संकल्प करून साधकांना भावाच्या ज्येष्ठ टप्प्याला नेले.’ त्यामुळे बहुतांश साधकांचा भाव जागृत झाला आणि त्यांच्या डोळ्यांतून येणारे भावाश्रू थांबतच नव्हते. या वेळी साधकांच्या आनंदात वाढ झाली. हे सर्व परात्पर गुरुदेव रथामधून पहात होते. त्या वेळी त्यांचाही भाव जागृत होत होता आणि सर्व साधकांना पाहून त्यांनाही पुष्कळ आनंद झाल्याचे जाणवत होते.
५. आश्रमातील वातावरण त्रेतायुगाप्रमाणे झाल्याचे जाणवणे
‘जसा त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचा राज्याभिषेक झाल्यावर अयोध्येत विजयी रथोत्सव झाला, तसाच परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव झाला’, असे मला जाणवत होते. आश्रमातील वातावरण त्रेतायुगाप्रमाणे झाले होते.
६. त्याच वेळी रामनाथी आश्रम सूक्ष्मातून स्वर्गासारखा वाटत होता आणि ‘स्वर्गात रथोत्सव होत आहे’, असे जाणवत होते.
७. ‘तीनही गुरूंचे आगमन आणि रथोत्सव यांमुळे अनेक साधकांच्या भोवतालचे २ – ३ फूट त्रासदायक आवरण न्यून झाले’, असे मला जाणवले.
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)
|