आमचा शिवसेनेला पुढे नेण्याचा प्रयत्न असून लवकरच मुंबईत येणार ! – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

गुवाहाटी – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर प्रथमच ते येथील ‘रॅडिसन ब्ल्यू’ उपाहारगृहाबाहेर आले. उपाहारगृहाच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमचा (बंडखोर नेते) शिवसेनेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. मुंबई येथील शिवसेनेचे नेते आणि काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जात असला, तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. येथील सर्वजण हिंदुत्व आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन येथे आले आहेत. त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. शिवसेनेने त्यांच्या संपर्कात कोण आहेत, हे सांगावे.

शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मुंबई येथील नेते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येथे ५० जण आहोत. सर्वजण स्वतःच्या मर्जीने आले आहोत. त्यांची भूमिकाही ठाम आहे. आमच्या पुढील निर्णयांची माहिती लवकरच प्रसारित केली जाईल. आम्ही लवकरच मुंबई येथे परत येत आहोत.