सातारा, २८ जून (वार्ता.) – खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याप्रकरणी माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची पोलिसांनी ५ घंटे चौकशी केली. यासाठी आमदार गोरे स्वत:हून वडूज पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले होते. ही चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी केली. या प्रकरणी वडूज येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र तेथेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांना सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी २ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने १ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.