स्तन आणि अंडाशय यांचा कर्करोग !

‘माझ्या मैत्रिणीची मावशी आणि आई दोघींनाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ (स्तनाचा कर्करोग) झाला होता. ते सगळे पाहून भीतीच वाटत आहे’, अशी चर्चा अनेक स्त्रिया करत असतात. सध्या शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाविषयी महिला अधिकाधिक जागरूक होतांना दिसत आहेत; पण तरीही योग्य वेळी योग्य त्या चाचण्या करून काळजी घेतली जात नाही, असे दिसून येते.

१. स्तनाच्या कर्करोगाची प्रारंभीची काही लक्षणे

स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण वयाच्या चाळीशीनंतर आढळत असले, तरी क्वचित् प्रसंगी तरुण स्त्रियांमध्येही ते दिसून येऊ शकते. स्तनामध्ये गाठ जाणवणे, स्तनाची वरची त्वचा लालसर किंवा जाड होणे, काखेत गाठ जाणवणे, स्तनाग्रामधून रक्त किंवा वेगळ्या रंगाचा स्राव येणे, स्तनाग्रे किंवा तेथील त्वचा आत ओढली जाणे, स्तनांत वेदना होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) दाखवणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा कर्करोगाची गाठ दुखत नाही; म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे टाळायला हवे.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

२. शहरी भागात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागील कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय

२ अ. लठ्ठपणा : प्रथम क्रमांकावर अर्थातच अति वाढलेले वजन आणि लठ्ठपणा आहे. लठ्ठपणामुळे केवळ स्तनांचाच नाही, तर अन्य विविध प्रकारचे कर्करोगही होऊ शकतात. अंगावर वाढलेली चरबी स्त्रियांच्या शरिरातील हॉर्मोन्सचे संतुलन ढळण्यास कारणीभूत ठरते. ‘स्तन’ हा अवयव हार्मोन्सवर अवलंबून असल्यामुळे हे असंतुलन त्याविषयीच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करते.

२ अ १. वजन न्यून करण्यासाठी व्यायाम करणे, चालणे आणि आहाराविषयीची काही पथ्ये पाळणे आवश्यक ! : सध्या रुग्णालयामध्ये येणाऱ्या चाळीशीच्या पुढील स्त्रियांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के स्त्रियांचे वजन अधिक असते. त्यांना व्यायाम करायचा सल्ला दिला की, त्या लगेचच ‘मला दिवसभर थोडाही वेळ कसा मिळत नाही’, याचे वर्णन करणे चालू करतात. येथे महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तुम्हाला व्यायाम करणे कसे अशक्य आहे, हे आधुनिक वैद्यांना पटवून देऊन काय साध्य होणार आहे ? तुमच्या दैनंदिन नियोजनातून वेळ काढून व्यायाम करणे, हे स्वत:च्याच हिताचे नाही का ? यावर विचार करणे आवश्यक आहे.

चाळिशीनंतर शरिराचे चयापचय, म्हणजे ‘मॅटाबॉलिक रेट’ अल्प झालेला असतो. त्यामुळे अल्प खाणे आणि अधिक व्यायाम करणे यांविना वजन न्यून होत नाही. भात, बटाटा, साखर, मैदा हे पदार्थ आहारात अल्प असावेत. साखर दिवसातून ४ चमच्यांहून अल्प खाणेच श्रेयस्कर आहे. प्रतिदिन ८ ते १० सहस्र पावले चालणे आणि ते शक्य नसेल, तर ‘यू ट्यूब’वरील ‘Leslie Sansone’च्या चित्रफीती बघून त्याप्रमाणे प्रतिदिन अर्धा घंटा व्यायाम करणे पुष्कळ लाभदायक आहे.

२ आ. स्वयंपाकघरातील प्लास्टिकचा वापर टाळा ! : पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील प्लास्टिक जेवढे न्यून करता येईल, तेवढे करावे. ‘मायक्रोवेव्ह’मध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक वापरू नये. सगळ्याच प्रकारचे प्लास्टिक वाईट असते, असे नाही; पण पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडे खाण्याच्या पदार्थांना चालणारे प्लास्टिक प्रमाणित नाही. त्यामुळे विशेषतः गरम पदार्थ आणि प्लास्टिक यांचा संबंध न आलेला चांगला ! पूर्वी मुलांना डबेही स्टीलचे दिले जायचे. स्वयंपाकघरात चिनीमाती, स्टील किंवा काच यांची भांडी वापरावीत.

२ इ. चारचाकीच्या सीटचे प्लास्टिकचे आच्छादन काढावे ! : अनेक जण नवीन चारचाकी गाडी घेतली की, सीटवरील प्लास्टिकचे आच्छादन काढत नाहीत. जेव्हा आपली गाडी उन्हात उभी असते, तेव्हा गाडीतील सर्व प्रकारचे प्लास्टिक थोडे विघटित होऊन गाडीतील हवेत मिसळू शकते. त्यामुळे सीटवरील प्लास्टिकचे आच्छादन काढावे. वातानुकूलित यंत्र (‘एसी’) चालू केल्यावर २ मिनिटे आतील हवा बाहेर जाऊ द्यावी आणि नंतर खिडकी बंद करावी.

२ ई. मांसाहारामुळे कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असणे : मांसाहारी पदार्थांच्या अतिसेवनाने वजन वाढते, तसेच कर्करोगाचा धोकाही वाढवते. तयार प्रक्रिया केलेले मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ, म्हणजे नगेट्स, चिकन फिंगर्स, बटाट्याचे पदार्थ यांचेही अतिसेवन टाळले पाहिजे. घरचे ताजे अन्न, अधिक शिळे नसलेले, भरपूर फळे, कच्च्या फळभाज्या आहारात घ्याव्यात.

२ उ. मानसिक ताण घेऊन कर्करोगाला आमंत्रण देऊ नका ! : उशिरा लग्न करणाऱ्या आणि उशिरा मुले जन्माला घालणाऱ्या किंवा लग्न न झालेल्या, तसेच प्रसुतीनंतर स्तनपान न केलेल्या स्त्रिया यांच्यामध्ये बाकीच्या स्त्रियांहून स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक संभवतो. मासिक पाळी पुष्कळ लवकर चालू होणे आणि पुष्कळ उशिरापर्यंत, म्हणजे पन्नाशीनंतर चालू रहाणे, या दोन प्रकारच्या स्त्रियांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे.

यात सर्वांत महत्त्वाचे सूत्र, म्हणजे मानसिक ताण न्यून केला पाहिजे. अति मानसिक ताणामुळे प्रतिकारशक्ती न्यून होते, तसेच शरिरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ही दोन्ही कारणे पुष्कळ वर्षे तशीच राहिली, तर कर्करोगाला निमंत्रण ठरू शकते. दैनंदिन जीवनात ताण अल्प करण्यासाठी नियमित चालायला जाणे, योगासने, प्राणायाम आणि ध्यान हे उत्तम उपाय आहेत.

३. आनुवंशिक प्रकारचे स्तन आणि अंडाशय यांचे कर्करोग यांचे निदान करण्यासाठी ‘बी.आर्.सी.ए.’ जनुकीय पडताळणी करा !

काही प्रकारचे स्तन आणि अंडाशय यांचे कर्करोग हे अनुवंशिक असतात. हे कर्करोग आई, मुलगी, बहीण, मावशी, मावसबहिणी अशा जवळच्या रक्ताच्या नात्यांमध्ये दिसून येतो. या प्रकारचा कर्करोग होण्यामागे ‘बी.आर्.सी.ए.-१’ आणि ‘बी.आर्.सी.ए.-२’ अशी दोन प्रकारची जनुके उत्तरदायी असतात. एखाद्या कुटुंबात ज्या व्यक्तीला स्तन किंवा अंडाशय यांचा कर्करोग झाला आहे, अशा व्यक्तीची पडताळणी करून ही जनुके त्या व्यक्तीमध्ये आहेत कि नाहीत, याचे निदान करता येते. ही जनुके नसल्याचे सिद्ध झाले, तर हा कर्करोग आनुवंशिक नाही, असे निदान करता येते. ही जनुके आहेत, असे सिद्ध झाले, तर वर नमूद केलेल्या जवळच्या नात्यातील स्त्रियांनी ही पडताळणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यानंतर जवळच्या नात्यातील स्त्रियांच्या पडताळणीत ही जनुके असल्याचे सिद्ध झाले, तर या स्त्रियांना स्तन आणि अंडाशय यांच्या कर्करोगाचा धोका पुष्कळ अधिक असतो, त्याप्रमाणे आपल्याला योग्य ती काळजी घेऊन अशा स्त्रियांचे प्राण वाचवणे शक्य होते. ही जनुकीय चाचणी ‘पॉझिटिव्ह’ (कर्करोगाचे निदान होणे) आलेल्या स्त्रियांची ‘मॅमोग्राफी’ तपासणी ३० व्या वर्षीच चालू केली जाते. ‘मॅमोग्राफी’ समवेतच ‘एम्.आर्.आय.’ ही पडताळणीही अधिक अचूक असल्याने प्रति २ वर्षांनी केली जाते. यासमवेतच सर्वच स्त्रियांनी प्रति मास एकदा स्वतःच्या स्तनाची पडताळणी करणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

४. ‘बी.आर्.सी.ए.’ जनुकीय पडताळणीचा लाभ

‘बी.आर्.सी.ए.’ जनुकीय पडताळणीचा लाभ असा की, अधिक धोका असलेल्या स्त्रिया सतत वैद्यकीय निगराणीखाली रहातात. त्यामुळे त्यांना स्तन आणि अंडाशय यांचा कर्करोग झाल्यास तो त्वरित लक्षात येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा कर्करोग वेळेत लक्षात आला, तर त्वरित उपचार करता येऊन तो निश्चित बरा होऊ शकतो.

याउलट हाच मौल्यवान वेळ बऱ्याच वेळा निष्काळजीपणा, भयगंड, तर कधी कधी अंधश्रद्धा यांमुळे स्त्रिया वाया घालवतात आणि कर्करोगाच्या जाळ्यात अडकतात. ‘बी.आर्.सी.ए.’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या स्त्रियांमध्ये स्तन किंवा अंडाशय यांचा कर्करोग आढळल्यास पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी स्तन किंवा अंडाशय यांचे शस्त्रकर्म करून काढून टाकण्याचा सल्लाही दिला जातो. याचे कारण असे की, स्तनाचा कर्करोग असलेल्या स्त्रीला अंडाशयाच्या कर्करोगाचाही धोका अधिक असतो आणि अंडाशयाचा कर्करोग असलेल्या स्त्रीला स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असू शकतो. एखाद्या स्त्रीला शस्त्रकर्माचा मार्ग मान्य नसेल, तर पुढची काही वर्षे औषधोपचारानेही हा धोका टाळता येणे शक्य आहे. हे सगळे उपाय टोकाचे वाटले, तरी ते सगळे स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी केले जातात. हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे.

५. आधुनिक वैद्यकीय संशोधनामुळे पुष्कळ आजार पूर्णपणे बरे होणे शक्य असल्याने वेळीच पडताळणी करून उपचार करणे आवश्यक !

‘बी.आर्.सी.ए.’ जनुक असलेल्या स्त्रिया पुण्यासारख्या शहरी भागातील काही प्रकारच्या समाजात अधिक दिसून येतात, असे वैद्यकीय संशोधनामध्ये आढळून आले आहे. कधी कधी कुटुंबातील कुणाला स्तनाचा कर्करोग असेल, तर त्याची विचित्र भीती काही स्त्रियांमध्ये दिसून येते. ही भीती इतकी पराकोटीची आणि अतार्किक असते की, त्या स्त्रिया कोणतीही पडताळणी करून घ्यायला नकारच देतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात. पडताळणी केली नाही; म्हणून काही आजार होणारच नाहीत, ही भाबडी समजूत करून घेणे कितपत योग्य आहे ? आधुनिक वैद्यकीय संशोधनामुळे सध्या पुष्कळ आजार वेळीच शोधून पूर्णपणे बरे करू शकतो. केवळ स्वतःकडे आणि आपल्या जीवलगांकडे लक्ष असणे महत्त्वाचे आहे.

– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे.

(साभार : मासिक ‘मेनका’)