गोव्यात ५ मासांत अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

पणजी, २६ जून (वार्ता.) – २६ जून हा आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा झाला. गोव्यात १ जानेवारी ते ३१ मे २०२२ या ५ मासांत सुमारे २ कोटी ५० लक्ष रुपये किमतीचे १०८ किलो अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी एकूण ५० गुन्हे नोंद झाले आहेत, तर एकूण ५९ जणांना कह्यात घेतले आहे, अशी माहिती राज्य पोलीस दल आणि केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे राज्यात प्रथमच वारंवार अमली पदार्थ व्यवहारात सहभागी होत असल्याने ३ संशयितांवर ‘अमली पदार्थविरोधी कायदा १९८८’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संशयितांमध्ये चित्रपट अभिनेता अर्जुन रामपालची मैत्रीण गॉब्रिएल हिचा भाऊ अझेसिलोस डेमेट्रिआडेस (रहाणारा, दक्षिण आफ्रिका) आणि उगोचुकू सोलोमन उबाबुको (रहाणारा, नायजेरिया) यांचा समावेश आहे. अमली पदार्थविरोधी पथक व्यवहारात गुंतलेल्यांची मालमत्ता गोठवणे, अमली पदार्थांच्या विरोधात समाजात जनजागृती करणे आदी कृती करत आहे. अमली पदार्थ नियंत्रण पथकाचे (‘एन्.सी.बी.’चे) अधीक्षक सुजीत कुमार सिंह म्हणाले,‘‘तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर रहावे आणि अमली पदार्थांचा व्यवहार कुठे होत असल्यास त्याविषयी पोलिसांना माहिती द्यावी.’’

गोव्याच्या सीमेवर कर्नाटकमध्ये अमली पदार्थाची केली जाते लागवड

उत्तर कर्नाटक, गदग जिल्हा, खानापूर आणि हुलिया या दुर्गम भागांत उसाच्या शेतीत मधोमध काही चौरस मीटरमध्ये गांजाची लागवड केली जाते आणि याचे पूर्ण नियंत्रण अमली पदार्थ माफियांकडे असते. या अमली पदार्थांची पुढे गोव्यात तस्करी केली जाते. यासाठी दक्षिण गोव्यातील जंगलामधून जाणार्‍या कच्च्या रस्त्यांचा वापर केला जातो. प्रतिदिन सीमा ओलांडणार्‍यांमध्ये मिसळून हे काम केले जाते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गोव्यात यापूर्वी ‘सिंथेटिक’ अमली पदार्थांचे उत्पादन केले जात असल्याचे उघडकीस आले होते. यापूर्वी पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतून ४० कोटी रुपयांचे, तर हणजुणे येथील एका प्रयोगशाळेतून १ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले होते. तसेच पालये, हरमल, मांद्रे, आगरवाडा, मोरजी, शापोरा, हणजुणे आदी भागांत परसबागेत, तसेच घरांमध्ये अमली पदार्थांची लागवड केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये स्थानिक आणि विदेशी नागरिक यांचा सहभाग असतो.