पणजी, २६ जून (वार्ता.) – बनावट कागदपत्रे सिद्ध करून ‘रिअल इस्टेट डेव्हलपर’ना (बांधकाम व्यावसायिकांना) भूमी विकल्याची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. उत्तर गोवा किनारपट्टीत विशेषत: आसगाव परिसरात अशी अनेक प्रकरणे आहेत. एका कुटुंबाच्या बनावट पोर्तुगीजकालीन ‘सेल डिड’च्या आधारे सुमारे ९ कोटी रुपये किमतीची १ सहस्र चौरसमीटर आणि १ सहस्र ६०० चौरसमीटर अशा दोन्ही भूमींची विक्री केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भूमी विकणार्यांनी ती विकत घेणार्यांना बनावट पोर्तुगीजकालीन ‘सेल डिड’ गोव्याच्या पुरातत्व आणि पुराभिलेख खात्यातील ‘बूक नंबर ५४४ मध्ये’ नोंद केल्याचे सांगितले होते. भूमी विकत घेणार्यांनी कागदपत्रांविषयी अधिक अन्वेषण केले असता पुरातत्व आणि पुराभिलेख खात्यामध्ये ‘बूक नंबर ५४४ मध्ये’ अशी कोणतीही अधिकृत नोंदणी नसल्याचे त्यांना खात्याकडून सांगण्यात आले. भूमी विकत घेणारे अनेक जण ‘बूक नंबर ५४४’ विषयी पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडे वारंवार चौकशी करू लागल्यानंतर खात्याला खात्याच्या बाहेर ‘बूक नंबर ५४४ खात्याकडे अस्तित्वात नाही’, असा फलक कार्यालयाबाहेर लावावा लागला होता. विशेष म्हणजे भूमीची बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्यांना भूमी मूळ कोणत्या व्यक्तीच्या नावे आहे आणि भूमीचा इतिहास त्यांना ठाऊक होता.
अवैधरित्या मालमत्ता विक्रीच्या प्रकरणी पेडणे पोलिसांकडून ४ जणांच्या विरोधात गुन्हा प्रविष्टचोपडे, पेडणे येथील एक बंगला विकल्याच्या प्रकरणी ४ कोटी ७९ लक्ष रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी राकेश शर्मा, विशाल गर्ग, हरिश अरोरा आणि अभिनव चांडला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. संशयितांनी तक्रारादाराकडून ४ कोटी ७९ लक्ष रुपये घेतले; मात्र तक्रारदाराला बंगला सुपुर्द केला नाही. |
भूमी बळकावल्याच्या प्रकरणी काळा पैसा गुंतवल्यास त्याचे अन्वेषण होणार
पणजी – भूमी बळकावल्याच्या प्रकरणी काळा पैसा गुंतवला असल्यास त्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून अन्वेषण होणार आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेले विशेष अन्वेषण पथक या प्रकरणातील प्रमुख आरोपी विक्रांत शेट्टी आणि महंमद सोहील सफी यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराचे अन्वेषण करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला पत्र लिहिणार आहे.
या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने संशयित विक्रांत शेट्टी आणि महंमद सोहील सफी यांच्या खात्याविषयी संबंधित अधिकोषातून सविस्तर तपशील मागवला आहे. दोन्ही संशयितांचे अधिकोषातील खाती बंद केली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही संशयितांनी भूमी बळकावल्याच्या प्रकरणी काळा पैसा गुंतवल्याचा पथकाला संशय आहे. विशेष अन्वेषण पथकाने या प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना कह्यात घेतले आहे, तर याविषयी अन्य तिघांना अन्वेषणासाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणी अनेकांचा सहभाग असल्याचा पथकाला संशय असून पुरावे मिळाल्यानंतर अजूनही अनेकांना कह्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.