दक्षता विभागाने माझ्या घरावर धाड टाकतांना माझ्या मुलाची हत्या केली !

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कह्यात घेलेल्या पंजाबमधील आय.ए.एस्. अधिकार्‍याचा आरोप

डावीकडून प्रशासकीय अधिकारी संजय पोपली आणि कार्तिक पोपली

मोहाली (पंजाब) – पंजाबचे वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस्.) संजय पोपली यांनी त्यांचा मुलगा कार्तिक यांची दक्षता विभागाने हत्या केल्याचा आरोप केला. दक्षता विभागवाले माझीही हत्या करतील, असा दावाही त्यांनी केला. कार्तिक यांच्या हत्येसाठी संजय पोपली यांनी दक्षता विभागाचे उपायुक्त अजय कुमार यांना उत्तरदायी ठरवले आहे. संजय पोपली यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना कह्यात घेण्यात आले आहे. दक्षता विभागाने संजय पोपली यांच्या घरातून १२ किलो सोने जप्त केले आहे. तसेच ४ आयफोन, सॅमसंग फोल्डर फोन, स्मार्ट घड्याळे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

१. पोपली यांनी आरोप केला आहे की, दक्षता विभागाने धाड घातल्यावर माझ्या मुलाला घराच्या वरच्या मजल्यावर नेऊन तेथे त्याची गोळ्या घालून हत्या केली.

२. दक्षता विभागाचे उपायुक्त अजय कुमार यांनी सांगितले की, आमच्या पथकाने पोपली यांच्या घरावर धाड टाकली; परंतु कार्तिक पोपली यांच्या मृत्यूशी आमचा काहीही संबंध नाही. आमचे पथक परत आल्यानंतर हा प्रकार कळला. मी त्यांच्या घराच्या आतही गेलो नाही.

३. दुसरीकडे पोलिसांनी ‘कार्तिकने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली’, असा दावा केला.