पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचे विभाजन होणार !

कर्नाटकातील भाजप सरकारचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचा दावा

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती

बेळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उत्तरप्रदेश राज्याचे ५, महाराष्ट्राचे २ आणि कर्नाटक राज्याचे २ तुकडे करून नवीन राज्ये निर्माण करण्याची भाजपची योजना आहे, असा दावा कर्नाटकातील भाजप सरकारचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केले. ‘देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने करता यावा, यासाठी ५० नवीन राज्ये निर्माण करायची अशी मोदी यांची योजना आहे’, असेही कत्ती यांनी सांगितले. ‘बेळगाव बार असोशिएशन’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

उमेश कत्ती पुढे म्हणाले की, उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच दक्षिणेकडील राज्यांवरही स्वतःचा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी तेथील राज्यांचे विभाजन केले पाहिजे, अशी भाजपच्या नेत्यांची पूर्वीपासूनचीच मागणी आहे. कर्नाटकचा भूभाग मोठा असून कर्नाटकच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांचा कर्नाटकच्या राजकारणावर अधिक प्रभाव आहे. हाच अभ्यास करून भाजपने कर्नाटकच्या विभाजनाची योजना बनवली आहे. कर्नाटकातील ‘उत्तर कन्नड’ हे स्वतंत्र राज्य निर्माण केले जाणार आहे.