#Ayurved #आयुर्वेद : रोग झाल्यास वनौषधी वापरा !

येणाऱ्या आपत्काळाच्या दृष्टीने पुढील आयुर्वेदीय वनौषधींची लागवड करा !


सुंठीचे विविध रोगांवरील उपयोग

हिवाळा संपून येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये, तसेच पावसाळ्यामध्ये विकार होऊ नयेत, यासाठी   १ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये पाव चमचा सुंठ चूर्ण घालून पाण्याला उकळी आणावी आणि हे पाणी बाटलीत किंवा तांब्यात भरून ठेवावे. तहान लागेल, तेव्हा हे पाणी थोडे थोडे प्यावे.

१. पडसे (सर्दी)

पाव चमचा सुंठ, अर्धा चमचा तूप आणि १ चमचा मध एकत्र करून दिवसातून २-३ वेळा चघळून खावे.

२. पडश्यामुळे (सर्दीमुळे) डोके दुखणे

त्रास होईल तेव्हा पुरेशा प्रमाणात सुंठीचे चूर्ण घेऊन, त्यात गरम पाणी मिसळून कपाळावर पातळ लेप करावा आणि १ घंट्याने गरम पाण्याने तो धुऊन टाकावा. लेप धुतल्यावर त्या ठिकाणी आग होत असल्यास ती न्यून होण्यासाठी त्या भागावर लिंबाचा रस चोळावा.

३. कोणत्याही प्रकारचा खोकला आणि छातीत कफ होणे

खोकला येईल तेव्हा पाव चमचा सुंठ, अर्धा चमचा तूप आणि १ चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे चाटावे.

४. तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, पोटात दुखून शौचाला होणे, आव पडणे, अतीसार (जुलाब) आणि अपचन होणे

प्रत्येकी पाव चमचा सुंठ, तूप आणि गूळ यांचे मिश्रण दिवसातून २-३ वेळा शक्यतो जेवणाच्या अर्धा घंटा आधी चघळून खावे.

५. घशात आणि छातीत जळजळणे, घशाशी आंबट येणे, मळमळणे आणि उलट्या होणे

त्रास होईल तेव्हा किंवा दिवसातून ३-४ वेळा पाव चमचा सुंठ आणि १ चमचा पिठीसाखर यांचे मिश्रण चघळून खावे.

६. सांधे आखडणे, तसेच विशेषतः सकाळच्या वेळेत सांधे दुखणे आणि सुजणे

दुपारी आणि रात्री जेवणाच्या अर्धा घंटा आधी पाव चमचा सुंठ आणि १ चमचा एरंडेल पोटात घेऊन वर अर्धी वाटी गरम पाणी प्यावे. त्यासह रात्रीच्या जेवणानंतर पुरेशा प्रमाणात सुंठीचे चुर्ण घेऊन त्यामध्ये गरम पाणी मिसळून दुखणाऱ्या सांध्यावर जाडसर लेप करावा. एका घंट्याने लेप गरम पाण्याने धुऊन टाकावा. लेप धुतल्यावर त्या ठिकाणी आग होत असल्यास तर न्यून होण्यासाठी लिंबाचा रस चोळावा.

७. छातीत कळा येऊन अस्वस्थ वाटणे आणि वरचेवर ढेकर येणे

त्रास होईल तेव्हा पाव चमचा सुंठ आणि अर्धा चमचा मध वरचेवर चाटावे.

८. गर्भवती स्त्रीला आलेला ताप आणि श्वेतपदर

सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा सुंठ, अर्धी वाटी दूध आणि १ वाटी पाणी हे मिश्रण १ वाटी शिल्लक राहीपर्यंत उकळून, गाळून प्यावे. हे औषध घेतल्यावर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये.

९. थकवा आणि वजन न्यून असणे या विकारांवर, तसेच वीर्यवृद्धीसाठी

सकाळी रिकाम्या पोटी अर्धा चमचा सुंठ, अर्धी वाटी दूध आणि १ वाटी पाणी हे मिश्रण १ वाटी शिल्लक राहीपर्यंत उकळून, गाळून प्यावे. यानंतर साधारण १ घंटा काही खाऊ-पिऊ नये.

सुंठीचे अन्य उपयोग

जेवण बनवतांना मसाल्याच्या रूपात सुंठीचा उपयोग होतो. नेमीच्या चहात चवीपुरती सुंठ घालून घ्यावी. दुपारच्या जेवणावर ताक प्यायचे असल्यास त्यात चवीपुरती सुंठ आणि काळे मीठ टाकून प्यावे.

सुंठीचा वापर कधी टाळावा ?

उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, लघवीची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे इत्यादी उष्णतेची लक्षणे असतांना उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर येणारा शरद ऋतू (ऑक्टोबर हिट) या काळात सुंठीचा वापर अल्प करावा किंवा टाळावा. सुंठीच्या वापराने उष्णतेची लक्षणे निर्माण झाल्यास सुंठ बंद करून लिंबू सरबत प्यावे.

#Ayurved #आयुर्वेद #Ayurveda