#Ayurved #आयुर्वेद : …पाणी किती आणि कधी प्यावे ?

आयुर्वेद काय सांगतो ?

योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणाऱ्यांना सकाळी अधिक पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते.

१. जेवतांना मधे मधे थोडे पाणी प्यावे !

जेवतांना पाणी प्यावे कि पिऊ नये ? याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. याविषयी आयुर्वेदात सांगितलेला नियम पुढील प्रमाणे आहे.

समस्थूलकृशा भक्तमध्यान्त प्रथमाम्बुपाः ।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ५, श्लोक १५

अर्थ : जेवतांना मधे मधे थोडे पाणी प्यावे. यामुळे पचन नीट होते. जेवणानंतर (भरपूर) पाणी प्यायल्यास व्यक्ती स्थूल होते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास भूक मंदावते, जेवण न्यून जाते आणि व्यक्ती कृश होते; (पण असे कृश होणे आरोग्याला अपायकारक असते.)

२. जेवणात आमटी, ताक इत्यादी द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात असल्यास वेगळे पाणी पिण्याची आवश्यकता नसणे

जेवणात घन आणि द्रव पदार्थांची मात्रा किती असावी, याविषयी पुढील सूत्र मार्गदर्शक आहे.

अन्नेन कुक्षेर्द्वावंशौ पानेनैकं प्रपूरयेत् ।
आश्रयं पवनादीनां चतुर्थमवशेषयेत् ।।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ८, श्लोक ४६

अर्थ : पोटाचे चार भाग कल्पिल्यास जेवतांना त्यांतील २ भाग घन पदार्थाने, तर १ भाग द्रव पदार्थाने भरावा. पोटाचा १ भाग वात, पित्त आणि कफ यांसाठी मोकळा ठेवावा. जेवतांना मधे मधे थोडे पाणी प्यायल्याने ते अन्नाशी नीट मिसळले जाऊन अन्नपचन सुलभतेने होण्यास साहाय्य होते. यामुळे जेवतांना मधे मधे थोडे पाणी पिणेच योग्य आहे. जेवणात आमटी, ताक इत्यादी द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात असल्यास वेगळे पाणी पिण्याची आवश्यकता नसते. जेवणापूर्वी किंवा जेवल्यावर तहान लागल्यास १ – २ घोट पाणी पिण्यास आडकाठी नाही. तहान लागल्यावर १ – २ घोट पाणी प्यायल्याने अग्नि मंद होत नाही.

व्यायाम आदींमुळे शरीर गरम झालेले असतांना लगेच पाणी पिऊ नये !

व्यायाम केल्यावर; शारीरिक श्रम झाल्यावर; उन्हात फिरल्यावर; तसेच शेगडी, भट्टी, यज्ञकुंड आदींच्या जवळ काम केल्यावर लगेच पाणी न पिता थोडा वेळ थांबून, शांत बसून शरिराचे तापमान सामान्य झाल्यावर पाणी प्यावे. लगेच पाणी प्यायल्याने शरिराची वाढलेली उष्णता आणि पाण्याची शीतता यांचा विरुद्ध संयोग होऊन रक्त दूषित होते आणि वात, पित्त आणि कफ हे दोष वाढल्याने अग्नीही मंद होतो.

शीतकपाटातील गार पाण्यापेक्षा उकळून थंड केलेले पाणी अधिक चांगले !

‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे परीक्षण केले असता नळाचे साधे पाणी आणि शीतकपाटातील गार पाणी यांच्या तुलनेत उकळून थंड केलेल्या पाण्याची सकारात्मक ऊर्जा अधिक होती.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

३. ‘जेवतांना किंवा जेवल्यानंतर लगेच थोडेही पाणी पिऊ नये’, असे सांगणे चुकीचे !

काही जण ‘जेवतांना किंवा जेवणानंतर लगेच थेंबभरही पाणी न पिता जेवल्यावर दीड घंट्याने पाणी प्यावे’, असे एकांगी मत मांडतात. जेवतांना पाणी का आणि किती प्यावे, हे वर दिले आहे. जेवणानंतर दीड घंट्याने तहान लागल्यासच पाणी प्यावे. येथेही अन्न पुढे ढकलण्यासाठी अनावश्यक पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर दीड घंट्याच्या काळात आवश्यकता वाटल्यास पाणी प्यावे. त्या वेळी तहान रोखून धरू नये.

#Ayurved #आयुर्वेद #Ayurveda