उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. चरणदास रमानंद गौडा हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. चरणदास रमानंद गौडा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले. पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
१. सेवाभाव
चरणदास आश्रमसेवा करतो. तो भोजनगृहातील टब स्वच्छ करतो. साधकांना सामूहिक स्वच्छतेच्या सेवेत साहाय्य करतो आणि कोणी साधक जड साहित्य घेऊन जात असतील, तर त्यांना ते उचलण्यास साहाय्य करतो. त्याची शारीरिक क्षमता नाही, तरी तो सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी ‘त्याचा आश्रमाप्रती आणि सेवेप्रती किती भाव आहे ?’, हे शिकायला मिळते.
२. तत्त्वनिष्ठता
एकदा एक बालसाधक माझ्याशी मोठ्या आवाजात बोलत होता. त्या वेळी चरणदासने त्याला सांगितले, ‘‘आपण मोठ्यांशी मोठ्या आवाजात बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे तू त्यांची क्षमा माग.’’ यामधून चरणदासमधील तत्त्वनिष्ठता शिकायला मिळाली.
३. आज्ञापालन
चरणदासकडून काही चुकले, तर पू. रमानंदअण्णा त्याला ‘ध्यानमंदिरातून किंवा खोलीतून २ घंटे बाहेर यायचे नाही’, अशी शिक्षा करतात. पू. अण्णा सांगतात, तसे तो ऐकतो आणि आज्ञापालन करून शिक्षाही पूर्ण करतो.
४. चांगली आकलनक्षमता
तो वेगवेगळ्या देवतांच्या आणि पौराणिक कथा पहातो. त्याने पाहिलेल्या कथा तो जेवतांना किंवा अन्य वेळी त्याच्याशी बोलतांना पुष्कळ चांगल्या प्रकारे सांगतो.
५. खेळतांना आपत्काळासाठी घर बांधणे
चरणदास खेळतांना त्याच्या खेळण्यांनी किंवा अन्य वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रकारची घरे बनवतो. त्याला कोणी त्याविषयी विचारले, तर तो सांगतो, ‘‘आपत्काळात सर्व साधक इथे येतील. तेव्हा त्यांना रहाण्यासाठी मी घरे बांधत आहे.’’
६. मोठ्यांचे अनुकरण करणे
पू. अण्णा त्यांच्या आईचा किंवा अन्य साधकांचा व्यष्टी-समष्टी साधनेचा आढावा घेतात. त्याप्रमाणे चरणदासही त्यांचे अनुकरण करून ‘आज मी सर्वांचा आढावा घेणार आहे’, असे म्हणून आढावा घेतो. उत्तरदायी साधक जसे बोलतात, वागतात, तसे तो त्यांचे अनुकरण करत असतो. तेव्हा ‘चरणदासमध्ये किती प्रगल्भता आहे ?’, हे लक्षात येते.