पुणे येथे २५ जूनला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन ! 

फ्रेंच पत्रकार फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

विंग कमांडर शशिकांत ओक आणि नेहा प्रधान

पुणे, २३ जून (वार्ता.) – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित एका चित्रप्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम (वडगाव शिंदे, लोहगाव) येथे आयोजन करण्यात आले आहे. २५ जूनला फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे विनामूल्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांची मुलगी नेहा प्रधान या उपस्थित होत्या.

१० वरिष्ठ सैन्य ‘कमांडर’ यांनी एकत्रित अभ्यास करून सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरेंची लढाई कशी खेळली गेली असेल ? यावर आधारित ६० चित्रांचे अभ्यासपूर्ण वर्णन करणारे फलक सिद्ध केले आहेत. ‘या ऐतिहासिक लढाईतून बोध घेऊन युवा पिढीचे राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक जनतेने, तसेच युवा पिढीने घ्यावा’, असे आवाहन विंग कमांडर शशिकांत ओक यांनी पत्रकार परिषदेत केले.