कल्याण येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते कै. प्रमोद जोशी यांना हिंदुत्वनिष्ठांकडून श्रद्धांजली !

कै. प्रमोद जोशी

ठाणे, २२ जून (वार्ता.) – श्रीरामजन्मभूमी विषयाअंतर्गत पुरातत्व विभाग आणि त्याच्याशी संबंधित कायदेशीर गोष्टी यांचा सखोल अभ्यास असलेले अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांचे १ जून या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी नुकतेच कल्याण येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे हिंदुत्वाचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा निश्चय केला.

‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन संघटितपणे कार्य करायला हवे’, अशी मनीषा घेऊन कार्य करणाऱ्या कै. प्रमोद जोशी यांच्याविषयी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अनुभव सांगून श्रद्धांजली अर्पण केली. त्याआधी कै. प्रमोद जोशी यांचे चिरंजीव कु. वेदराज जोशी यांनी त्यांच्या वाडवडिलांच्या कार्याविषयी सांगून ‘मी धर्मरक्षणाचे काम करत राहीन’, असे वचन दिले. कल्याण शहर वारकरी प्रबोधन ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी श्रद्धांजली वाहून शांतीमंत्राचे पठण केले.