बांदा (उत्तरप्रदेश) येथे शिक्षकाकडून अल्पवयीन ३ विद्यार्थिनींवर बलात्काराचा प्रयत्न

परीक्षेत अनुतीर्ण करण्याची दिली होती धमकी

बांदा (उत्तरप्रदेश) – येथील ओरन भागात एका शिक्षकाने ३ अल्पवयीन विद्यार्थिनींना परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी देत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी पोलिसांकडे आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या ३ विद्यार्थिनी गावातील मिडल स्कूलमध्ये शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी शिक्षकाने एक एक करून तिघींना शाळेच्या खोलीत बोलावले आणि नंतर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी विरोध केल्यावर शिक्षकाने त्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली. ‘ही गोष्ट घरीही सांगू नकोस’ असे शिक्षकाने सांगितले. या तिन्ही विद्यार्थिनी मैत्रिणी असून त्यांचे वय १२ वर्षे आहे. मुलींनी घरी जाऊन हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय शाळेत पोचले असता सदर शिक्षकाने त्यांना धमकावून तेथून बाहेर काढले. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. ‘आरोपीवर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे.

संपादकीय भूमिका

नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, हेच यातून स्पष्ट होते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !