भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मूर्मू  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार घोषित !

विरोधी पक्षांकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी !

नवी देहली – पुढील मासात होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (‘रालोआ’कडून) मूळच्या ओडिशा येथील आणि सध्या झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. ‘रालोआ’कडून या पदासाठी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उईके यांच्या नावाचीही चाचपणी करण्यात आली होती.

दुसरीकडे काँग्रेससह सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांची नावे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत होती; परंतु तिघांनी त्यास नकार दिला. अंतत: यशवंत सिन्हा यांच्या नावावर सर्व विरोधी पक्षांचे एकमत झाले.

२९ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १८ जुलै या दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल आणि २१ जुलैला निकाल घोषित होतील.

कोण आहेत द्रौपदी मूर्मू ?

द्रौपदी मूर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. झारखंडच्या नवव्या राज्यपाल मूर्मू या ओडिशातील रायरंगपूरमधून आमदार होत्या. राज्यपाल बनलेल्या त्या ओडिशातील पहिल्या महिला नेत्या आहेत. यापूर्वी वर्ष २००२ ते २००४ या काळात ओडिशा राज्यात त्या भाजप-बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या.