शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदारांसह बंड !

  • ३० हून अधिक आमदार समवेत असल्याचा दावा

  • शिंदे आमदारांसह गुजरातमध्ये !

  • शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले !

डावीकडून एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेत किंमत दिली जात नसल्याच्या कारणावरून अप्रसन्न असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे. शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन सूरत (गुजरात) येथे गेले आहेत. तेथे आमदारांचा मुक्काम असलेल्या ‘ली मेरिडियन’ हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवले. त्याजागी शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

२० जून या दिवशी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटल्याने भाजपचे सर्व ५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून अप्रसन्नता व्यक्त केली जात आहे.

हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न ! – शरद पवार

(उजवीकडे) शरद पवार

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देहली येथे पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी अशा प्रकारची बंडाळी झाली होती. यामधूनही मार्ग निघेल, याची मला निश्चिती आहे. शिवसेनेचे नेतृत्व जो काही निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असेल; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पालट करण्याची आवश्यकता नाही.’’ ‘राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमवेत जाणार का ?’, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही विरोधातही बसू शकतो. हाच प्रश्न पत्रकारांनी पुन्हा विचारला असता त्यावर केवळ हसून पवार यांनी उत्तर देणे टाळले.

मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला !

मिलिंद नार्वेकर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सूरत येथे पाठवले. त्यांच्यासह माजी आमदार रवींद्र फाटक हेही होते. त्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी २० ते ३० मिनिटे चर्चा झाली.

शिवसेनेच्या आमदारांवर जीवघेणे आक्रमण होत आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

महाराष्ट्रात भूकंप होणार नाही. काही आमदारांची दिशाभूल झाली आहे. त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. जे आमदार सूरतमध्ये आहेत, त्यांना मुंबई येथे येऊ दिले जात नाही. सर्वांना बंदिस्त करण्यात आले आहे. सर्व आमदारांना मुंबईत यायचे असून या संघर्षात ते शिवसेनेसमवेत आहेत. भाजपच्या प्रयत्नांना यश येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण करून त्यांना गुजरात येथे ठेवण्यात आले आहे. या आमदारांवर गुजरात पोलिसांसमवेत केंद्रीय पोलिसांचा पहारा आहे. या आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर जीवघेणे आक्रमण झाले असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २१ जूनला येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

अप्रसन्न एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी शिवसेनेसमोर ठेवलेल्या अटी !

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समवेत जायचे नाही. शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसेच शिवसेनेच्या आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे’, या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला सिद्ध आहेत; पण ‘सर्व आमदारांसमवेत चर्चा केली जावी’, अशी त्यांची मागणी आहे.

शिंदे यांची मुख्यमंत्र्यांशी भ्रमणभाषवर चर्चा !

मला मंत्रीपद नको; पण भाजपसमवेत सरकार बनवा ! – एकनाथ शिंदे

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भ्रमणभाषवरून चर्चा केली. या वेळी शिंदे म्हणाले की, मला मंत्रीपद नाही दिले, तरी चालेल; पण भाजपसमवेत सरकार बनवा. माझ्या विरोधात वातावरण का बिघडवले जाते ? २४ घंट्यांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का ? या वेळी ठाकरे यांनी ‘तुम्ही सर्व सोडून मला भेटा. सर्व व्यवस्थित होईल’, असे सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे अन्य प्रस्ताव !

आगामी नवीन सरकारमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि मी उपमुख्यमंत्री असेन, असा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले, तरच एकनाथ शिंदे आणि अप्रसन्न आमदार यांचा गट शिवसेनेत राहील, असा दुसरा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारमधील असंतोष उघड ! – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारमधील प्रचंड अप्रसन्नता आणि असंतोष उघड झाला असून त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार सत्तेवर येईपर्यंत भाजपचा संघर्ष चालूच राहील.’’

ठाकरे सरकार संकटात !

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार संकटात असल्याचे चित्र आहे. मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि अपक्ष १४ आमदार यांसह सुरत येथे गेले आहेत. या ३० जणांमध्ये शिंदे आणि अन्य ३ अशा एकूण ४ मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एकूण १९ आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. भाजपला आता १३४ आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार बनवण्यासाठी १४४ सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या आकड्यांमधील भेद अत्यल्प आहे.

शिंदे यांना ८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक

विधानसभेत शिवसेनेचे एकूण ५६ आमदार आहेत. आमदारकी रहित होऊ नये, यासाठी शिंदे यांना २/३ आमदार, म्हणजे ३७ आमदार जमवायचे आहेत. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण २९ आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी ८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

शिंदे आणि देशमुख यांच्यात खडाजंगी !

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सूरत येथे ३० हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरत येथे आल्यामुळे देशमुख अप्रसन्न आहेत.

नेत्यांच्या प्रतिक्रिया !

१. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे सांगितले, ‘‘आम्ही बाळासाहेबांचे (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे) कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याविषयी आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही अन् करणार नाही.’’

२. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून काहीही निरोप मिळालेला नाही. त्यांनी जर आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला, तर आम्ही यावर निश्चित विचार करू.’’

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे विधीमंडळ गटनेतेपदाचे त्यागपत्र

२० जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला. या पराभवाचे दायित्व स्वीकारून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ गटनेतेपदाचे त्यागपत्र दिले.