पाकिस्तानमध्ये अननुभवी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी गर्भवती हिंदु महिलेचा जीव वाचण्याच्या प्रयत्नात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडले !

सिंध सरकारकडून चौकशीचा आदेश

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या थारपारकर जिल्ह्यातील एका गावातील भील समाजातील एका गर्भवती हिंदु महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करतांना डॉक्टरांनी नवजात अर्भकाचे डोके कापून ते गर्भातच सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच सिंध सरकारने चौकशीसाठी एक वैद्यकीय पथक स्थापन केले आहे. याविषयी जमशोरो येथील ‘लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्स’मधील स्त्रीरोग शाखेचे प्रमुख प्रा. राहील सिकंदर म्हणाले की, आरोग्य केंद्रातील अननुभववी कर्मचार्‍यांनी या महिलेवर उपचार चालू केल्याने ही घटना घडली. अर्भकाचे डोके महिलेच्या गर्भाशयामध्ये अडकले होते. महिलेचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी डोके कापले आणि तसेच गर्भात सोडून दिले. या महिलेवर आता आमच्या रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिच्यावर उपचार चालू आहेत.