अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून १२१ न्यायाधिशांचे स्थानांतर !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांचे बरेलीला स्थानांतर

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरिष्ठ विभागातील १२१ दिवाणी न्यायाधिशांचे स्थानांतर केले आहे. त्यात वाराणसीतील ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि वजू खाना बंद करण्याचा आदेश देणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांच्या नावाचाही समावेश आहे.

दिवाणी न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना वाराणसीतून बरेलीला पाठवण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे महानिबंधक आशिष गर्ग यांनी स्थानांतराची सूची घोषित केली. स्थानांतर झालेल्या सर्व न्यायाधिशांनी ४ जुलै २०२२ या दिवशीच्या दुपारपर्यंत पदभार स्वीकारावा लागणार आहे. याशिवाय अलाहाबाद उच्च न्यायालयाने अन्यही न्यायाधिशांचे स्थानांतर केले आहे. न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी ज्ञानवापी सर्वेक्षणाचा निकाल देतांना त्यांच्या जिवाला धोक असल्याचे सांगितले होते.