आषाढी वारीमध्ये मूलभूत सुविधांसाठी राज्यशासनाकडून ९ कोटी रुपयांच्या निधीची मान्यता

पुणे – आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी राज्यशासनाकडून ९ कोटी रुपयांच्या निधीची मान्यता देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्यांसह मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार २ कोटी ५९ लाख ७५ सहस्र रुपयांच्या निधीची मान्यता राज्यशासनाने दिली आहे. वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरवण्यासाठी ६ कोटी ७३ लाख २० सहस्र रुपयांच्या निधी मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मागणी करण्यात आलेल्या निधीपैकी ५० टक्के निधी राज्यशासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करायचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे. एकूण मान्यतेच्या २० टक्के प्रमाणात (१ कोटी ३४ लाख ६४ सहस्र रुपये) निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.