नगर, २० जून (वार्ता.) – शनिशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाने ५०० रुपये देणगी देऊन पावती फाडणार्या भाविकांना चौथर्यावर जाऊन तैलाभिषेक करू देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ जे भाविक ५०० रुपयांची देणगी देऊन पावती फाडू शकणार नाहीत, त्यांना तैलाभिषेकाचा विधी करता येणार नाही. यातून विश्वस्त मंडळ गरीब भाविकांचा शनिदेवतेवर अभिषेक करण्याचा संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक असा भेदभाव करणारा आहे.
धार्मिक नव्हे, तर आर्थिक हिताचे निर्णय घेणार्यांवर शनिदेवाची कधी तरी कृपा होईल का ? हा निर्णय विश्वस्त मंडळाने त्वरित मागे घ्यावा,अन्यथा याला विरोध करू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हिंदु जनजागृती समितीने दिलेले प्रसिद्धीपत्रक –
‘श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष भागवत बानकर यांनी ‘५०० रुपयांची देणगी पावती घेणार्या सर्व महिला आणि पुरुष यांना चौथर्यावर जाऊन अभिषेक करता येईल’, अशी घोषणा नुकतीच केली. त्याविषयी हिंदु जनजागृती समितीने ही मागणी केली.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. मंदिरांचे पावित्र्य जपण्यापेक्षा त्यांना व्यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्य आहे ? देवतेची पूजा-अर्चा वा विधी करण्याविषयी देवस्थानच्या नियमांत मनमानीपणे पालट करण्याचा कुणालाही अधिकार नाही. विश्वस्त मंडळाचा हा अन्यायकारक निर्णय देवस्थानच्या घटनेला अनुसरून नाही, असे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांचे म्हणणे आहे.
२. देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने सर्वांना चौथर्यावर जाऊन तैलाभिषेक करण्याची अनुमती दिली असली, तरी शनिशिंगणापूरच्या पंचक्रोशीतील सहस्रो महिला आजही चौथर्याखालून देवाचे दर्शन घेण्याची परंपरा श्रद्धेने पाळतात. याचाच आदर्श अन्यही महिलांनी या धार्मिक प्रथा-परंपरा जपल्या पाहिजेत.