अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !

१६० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अकोला, २४ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेला विशेष महत्त्व देण्यात आले असून त्या अनुषंगाने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा यांच्या ‘आय.के.एस्. आऊटरिच सिरिज २०२६’ अंतर्गत रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या विषयाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १६० ते १७० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाविद्यालयातील प्राध्यापक या वेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेश चंद्रवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिका आणि अधिवक्त्या श्रीमती श्रुती भट यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. श्रीमती श्रुती भट यांनी प्राचीन भारतातील विविध कालखंडांतील सुप्रिसद्ध गुरु-शिष्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून ‘शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानप्राप्ती नसून चारित्र्यनिर्मिती, मूल्यसंस्कार आणि आत्मविकासाची प्रक्रिया आहे’, हे अधोरेखित केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री. राजेश चंद्रवंशी यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. विद्यार्थ्यांममध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम काळाची आवश्यकता असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.’’