हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि साधना यांचे महत्त्व समाजमनावर बिंबवून त्याला कार्यप्रवृत्त करणारे स्वामी विवेकानंद !

आज १९ जून २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…

१९ जून २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांचे समाजाला हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि साधना यांविषयी उद्बोधक असलेले काही अमूल्य विचार येथे देत आहोत.

 १. धर्म आणि साधना यांविषयी मार्गदर्शन

१ अ. धर्म हा हिंदू जातीच्या जीवनाचा कणा असून तो भग्न झाल्यास हिंदूंचा संपूर्ण आणि सर्वांगीण विध्वंस अटळ आहे ! : तुम्ही जर धर्म सोडून जडाला सर्वस्व मानणाऱ्या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर तीन पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ज्या पायावर या धर्माचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला, असे समजा. याचा परिणाम ठरलेलाच आहे आणि तो म्हणजे ‘सर्वांगीण विध्वंस !’

१ आ. ‘ब्रह्मस्वरूप जाणून तद्रूप होणे’ (प्रत्यक्षानुभूती) म्हणजे धर्म होय ! : धर्म हा केवळ सिद्धांतामध्ये, मतमतांतरामध्ये किंवा बौद्धिक वादविवादात नाही. आपण ब्रह्मस्वरूप आहोत, हे जाणून तद्रूप होणे म्हणजे धर्म होय ! धर्म म्हणजे प्रत्यक्षानुभूती होय !

१ इ. ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी साधनाच करायला हवी ! : ‘अन्न, अन्न’ हे शब्द घोकण्यात आणि प्रत्यक्ष भोजन करण्यात पुष्कळ भेद आहे. त्याचप्रमाणे केवळ ‘ईश्वर, ईश्वर’ अशा पोपटपंचीने आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकणार नाही, त्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्न म्हणजे ‘साधना’च केली पाहिजे.

२. भारतीय ग्रंथांचे नेटाने आणि चिकाटीने अध्ययन अन् अनुशीलन करणे आवश्यक

अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, प्रथा, आचार-व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, तर त्यांच्यापैकी ९९ टक्के भारतीय विचारांचे सौंदर्य आणि भाव यांमुळे मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल.

३. आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचंड साठा भारताकडे असून भारतियांनी आता जगाला अध्यात्म शिकवायला हवे !

इंग्रज आणि अमेरिकन लोकांच्या तोडीचे तुम्हास व्हावयाचे असेल, तर त्यांच्यापासून शिकण्यासमवेच त्यांनाही तुम्ही शिकवले पाहिजे. जगाला आगामी कित्येक शतके देता येईल, इतका आध्यात्मिक ज्ञानाचा साठाही तुमच्याजवळ आहे. म्हणून हे कार्य तुम्ही केलेच पाहिजे.

४. देश भूमीच्या तुकड्यामुळे नव्हे, तर त्यागी, निष्कपट आणि सुसंस्कृत माणसांमुळेच महान बनतो !

स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक तुमच्यामध्ये निपजतील, तेव्हा हिंदुस्थान सर्व दृष्टीने महान होईल. माणसांमुळेच देश महान बनत असतो. नुसत्या भूमीच्या तुकड्यात काय आहे ?

५. भारतीय संस्कृतीत स्त्रीविषयी असलेला आदर जगात आणखी कुठेही आढळणार नाही !

ज्या समाजात सीता निर्माण झाली, त्या समाजात स्त्रीविषयी अतिशय आदर आहे. भारतात स्त्रीचा जेवढा आदर आहे, तेवढा जगात आणखी कुठेही केला जात नाही, हे मी जाणून आहे.

उर्वरित आयुष्य समाधी अवस्थेत घालवण्याच्या विचारांपासून श्री रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना परावृत्त करणे

स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ऐन तारुण्यात निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला होता. त्यांचे गुरु श्री रामकृष्ण यांच्या परमकृपेने हे साध्य होऊ शकले होते. ‘आपले उर्वरित आयुष्य या समाधी अवस्थेत घालवावे’, असे त्यांना वाटत होते; पण त्यांच्या गुरूंनी त्यांना या विचारांपासून परावृत्त केले; कारण वेदांच्या महान संदेशाची जाणीव करून देणे, हे मानवकार्य त्यांना अजून करावयाचे होते. त्यामुळे विवेकानंदांना ध्यान आाणि समाधी यांमध्ये मग्न राहून स्वतःचे भवितव्य घडवण्याचा विचार दूर सारावा लागला.

६. सामर्थ्यशाली, तेजस्वी आणि आत्मविश्वास असलेले केवळ १०० तरुण संपूर्ण जगात क्रांती घडवण्यासाठी पुरेसे आहेत !

खरी माणसे हवी आहेत. त्यानंतर सर्वकाही सहज प्राप्त होईल. आपल्याला पाहिजे आहेत सामर्थ्यशाली, तेजस्वी, आत्मविश्वास असलेले तरुण – सच्च्या हृदयाचे तरुण. असले शंभर युवक जरी मिळाले, तरी जगात खरोखर क्रांती होऊन जाईल.

(साभार : ‘शक्तीदायी विचार’, स्वामी विवेकानंद, (सहावी आवृत्ती), रामकृष्ण मठ, नागपूर)