ब्रिटनमध्ये पैगंबर यांची मुलगी फातिमा हिच्यावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मुसलमानांची मागणी

ब्रिटन सरकारचा नकार

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लेडी ऑफ हेवेन’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर मुसलमानांकडून इस्लामचा अवमान करण्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे; मात्र सरकारने बंदी घालण्याला नकार दिला आहे. विरोध करणार्‍यांमध्ये ब्रिटीश सरकारचे सल्लागार आणि लीड्स येथील मक्का मशिदीचे प्रमुख इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) कारी महंमद असीम यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधानंतर त्यांना त्यांच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे.

१. या चित्रपटामध्ये पैगंबर यांची मुलगी फातिमा हिची कथा दाखवण्यात आली आहे. विरोध करणार्‍या मुसलमानांचे म्हणणे आहे की, पैगंबर किंवा त्यांच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीविषयी चित्रपट बनवणे आमच्या धार्मिक भावना दुखावण्यासारखे आहे. आम्ही हे सहन करू शकत नाही.

२. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मलिक शिबाक यांना सामाजिक माध्यमांद्वारे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत; मात्र ‘मी अशा धमक्यांना घाबरणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटाचे दुसरे निर्माचे मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यासर अल-हबीब आहेत. ते शिया मुसलमान आहेत.

३. दिग्दर्शक मलिक शिबक यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा चित्रपट फातिमाचे जीवन, तिचा संघर्ष यांविषयीची कथा आहे. मला वाटते की फातिमा आमच्या इतिहासातील सर्वांत चांगली व्यक्ती आहे. कट्टरतावादी, भ्रष्टाचारी आदींशी कशा प्रकारे लढता येऊ शकते, हे तिच्याकडून शिकता येईल. त्यामुळेच आम्हाला वाटले की, तिची कथा सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.