विद्यार्थ्याला कारागृहात डांबणाऱ्या पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

शरद पवारांवरील ट्वीटचे प्रकरण

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या गुन्ह्यात २१ वर्षाच्या विद्यार्थ्याला एक मास कारागृहात डांबल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, ट्विटवर प्रतिदिन सहस्रो पोस्ट येत असतात. पोलीस त्या प्रत्येकाची प्रतिदिन नोंद घेणार का ? ज्या ट्विटर खात्यावरून हा गदारोळ माजलाय, त्यात कुणाचेही नाव नाही. मग एखाद्याला प्रथमदर्शनी थेट एक मास कारागृहात डांबता येते का ? पोलिसांनी असे गुन्हे पुन्हा नोंद करून घेऊ नयेत. निखिल भामरे हा औषधशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्याने पवारांच्या विरोधात मानहानीकारक पोस्ट केल्याने त्याच्याविरोधात ६ गुन्हे नोंद करण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणात त्याला फार्मसीची (औषधशास्त्र)परीक्षा देता आली नाही. त्यामुळे त्याचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती आहे. (त्या विद्यार्थ्याची हानी कशी भरून निघणार ? – संपादक) त्याने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचे अधिवक्ता सुभाष झा यांनी त्याच्या विरोधातील गुन्हा रहित करण्याची विनंती याचिकेत केली होती. सरकारी पक्षाने त्याचे कृत्य गंभीर असल्याचे म्हणणे मांडले; परंतु एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे गुन्ह्यात एक मास कारागृहात डांबणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.