पंतप्रधानांच्या हस्ते देहू (पुणे) येथील तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण
देहू (जिल्हा पुणे) – संत तुकाराम महाराजांचे अभंग शाश्वत आहेत. त्यांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या अभंगांच्या रूपात आजही कायम आहे. त्यामुळे त्यांचे अभंग आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. देहू येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जून या दिवशी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ‘देहूतील संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचे केंद्र नव्हे, तर सांस्कृतिक भविष्य घडवणारे मंदिर आहे’, असेही ते म्हणाले. या प्रसंगी देहू संस्थानकडून पंतप्रधान मोदी यांना तुळशीचा हार, तसेच मराठी आणि हिंदी भाषेत अभंग लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सहस्रो वारकरी उपस्थित होते.
देहूत पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण#narendramodi #punehttps://t.co/1ScGtHTGk2
— Lokmat (@lokmat) June 14, 2022
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘जगातील सर्वांत जुनी संस्कृती भारतात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहोत, याचे श्रेय भारतातील संतपरंपरा आणि ऋषि यांना आहे. देहू हे तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमीही आहे. देहूच्या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकाराम महाराज यांचा फार मोलाचा वाटा आहे.’’
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण करणार !
मागील काही मासांपूर्वी पालखी मार्गावरील २ राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला लाभले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम निर्माण ५ टप्प्यांत, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यांत पूर्ण केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.
क्षणचित्रे
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘श्री विठ्ठलाय नमः ।’ असा जयघोष करत त्यांच्या भाषणाला मराठीतून प्रारंभ केला. यासह त्यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि ओव्याही म्हटल्या.
२. मंदिराच्या आतमध्ये, तसेच परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील संतांनी समाजाला जागृत केले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेया प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाचा प्रारंभ अभंगाने केला. ते म्हणाले, ‘‘यादव साम्राज्य संपल्यानंतर समाज छिन्नविछिन्न झाला होता, अंधश्रद्धा वाढीस लागली होती, तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. अंधश्रद्धेपासून दूर रहाणारा समाज संत तुकारामांनी निर्माण केला.’’ |