वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी (वय ८० वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि कु. कृतिका खत्री यांनी वाराणसी येथील संस्कृतचे विद्वान श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी (वय ८० वर्षे) यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना जाणवलेली श्री. विद्यावाचस्पती यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘श्री. विद्यावाचस्पती यांचे घराणे वाराणसीमध्ये सुप्रसिद्ध आहे. संस्कृतचा वारसा चालवणारी त्यांची ही चौथी पिढी आहे. त्यांचे आजोबा आणि वडील संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी दिलेला संस्कृतचा वारसा श्री. विद्यावाचस्पती यांनी पुढे चालवला आहे. त्यांचा मुलगा डॉ. हिंमाशु त्रिपाठी हेही देहलीतील ‘लाल बहादुर शास्त्री’ विद्यापिठात संस्कृत विभागाचे प्रमुख (एच्.ओ.डी.) आहेत. ‘नातवानेही संस्कृतचा वारसा चालवावा’, यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी

श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी यांचा सत्कार करतांना पू. संजीव कुमार (उजवीकडे) श्री. विद्यावाचस्पती त्रिपाठी

१. साधी राहणी

श्री. विद्यावाचस्पती यांचे राहणीमान आणि वेशभूषा अत्यंत साधी आहे. त्यांचे घर सर्वसामान्यांसारखे आहे. ते पाहून आम्हाला ‘खर्‍या ज्ञानी पुरुषाचे वर्तन कसे साधेपणाचे असते ?’, याचा वस्तूपाठच पहायला मिळाला.

२. नम्रता

श्री. विद्यावाचस्पती यांना अनेक धर्मग्रंथ मुखोद्गत आहेत; मात्र त्यांचे उच्चार आणि वाणी यांमध्ये नम्रता आहे. सामान्यतः ज्ञानी व्यक्तीला ‘मी कोणीतरी वेगळा आहे’, याचे सतत भान असते आणि ते तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते; परंतु श्री. विद्यावाचस्पती यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा लवलेशही दिसत नव्हता.

३. शिकण्याची वृत्ती

आम्ही श्री. विद्यावाचस्पती यांना प्रथम वाराणसी येथील एका कार्यक्रमात भेटलो होतो. तेव्हा आम्ही त्यांना ‘हिन्दू राष्ट्र : आक्षेप एवं खण्डन’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला होता. त्यांनी तो ग्रंथ वाचला आणि या वेळी झालेल्या भेटीत ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही दिलेला ग्रंथ वाचतांना मी त्यावरच खुणा केल्या आहेत. या ग्रंथातून मला ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी शिकता आल्या.’’ त्यांना ‘या ग्रंथातून मी शिकलो’, हे सांगायला जराही संकोच वाटला नाही.

४. अहंशून्यता

श्री. विद्यावाचस्पती यांना धर्म, पुराणे, वेद आणि मनुस्मृती यांचे सखोल ज्ञान आहे, तरीही त्यांच्या बोलण्यात ‘मला काही येत नाही. मीही शिकत आहे. मी वयोवृद्ध आहे; पण ज्ञानवृद्ध नाही’, अशी अहंशून्यता दर्शवणारी वाक्ये होती.

५. बोलण्याच्या ओघात ते आम्हाला म्हणाले, ‘‘सहजीवन महत्त्वाचे आहे. ‘मी एकटा काही करीन’, याला काही अर्थ नाही. धर्मशास्त्रात परस्पर सहयोगाचाच पुरस्कार केला आहे.’’

६. ‘वय झाल्यामुळे धर्मसेवा करू शकत नाही’, याचे वाईट वाटणे

आम्ही श्री. विद्यावाचस्पती यांच्या घरून निघतांना ते आम्हाला म्हणाले, ‘‘आता माझे वय ८० वर्षे आहे. आतापर्यंत माझा सनातन संस्थेशी परिचय झाला नाही. तुमच्याशी परिचय होण्यास फार विलंब झाला.’’ ‘आता मी सनातन धर्माची सेवा करू शकत नाही’, याचे त्यांना पुष्कळ वाईट वाटत होते.

७. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याप्रतीचा भाव

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी पूर्वपरिचय असल्याप्रमाणे ते सद्गुरु पिंगळेकाका यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत होते. आम्ही तिथून निघत असतांना सद्गुरु पिंगळेकाकांनी त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘खरेतर मीच तुम्हाला नमस्कार करायला हवा.’’ त्यांचे वय ८० वर्षे असल्याने त्यांना वाकणे शक्य नव्हते. ‘त्यांनी मनातून सद्गुरु पिंगळेकाका यांना नमस्कार केला’, असे आम्हाला जाणवले.’

– कु. कृतिका खत्री आणि श्री. अभय वर्तक (धर्मप्रचारक, सनातन संस्था), देहली सेवाकेंद्र (४.२.२०२२)