कानूपर येथील हिंसाचारातील आरोपी महंमद इश्तियाक याची अवैध इमारत प्रशासनाने पाडली !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे नूपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत मुसलमानांनी शुक्रवार, ३ जून या दिवशी नमाजानंतर हिंसाचार केला होता. या प्रकरणी मुख्य सूत्रधार हयात जफर हाशमी याला अटक करण्यात आली होती. त्याचा या हिंसाचारातील सहकारी महंमद इश्तियाक याची अवैध इमारत बुलडोझरच्या साहायाने पाडून टाकली. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस, राखीव पोलीस दल, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ही इमारत पाडण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

इमारत अवैध होती, तर ती आधीच का पाडली नाही ? ती बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? जर महंमद इश्तियाक हिंसाचारात सहभागी नसता, तर प्रशासनानेही ही कारवाई केली असती का ? अशी आणखी किती अवैध बांधकामे आहेत, ज्यांवर प्रशासनाने अद्याप कारवाई केलेली नाही, हे जनतेला कळायला हवे !