१२ जून २०२२ या दिवशी (तिथीनुसार) शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्याचा उद्देश एक स्वतंत्र भारतीय राज्यव्यवस्थेची स्थापना करणे हा होता. वर्ष १९४७ मध्ये भारतावरील ब्रिटिशांची सत्ता अस्तंगत झाल्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था स्थापन करण्यात आली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने मार्गक्रमण करत असतांना या दोन्ही राज्यव्यवस्थांचे अवलोकन करणे महत्त्वाचे ठरेल.
१. छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ इस्लामी सत्तांना धूळ चारून हिंदवी स्वराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापणे
१ अ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ५ इस्लामी सत्ता म्हणजे सध्याच्या भाषेत ‘इस्लामिक स्टेट’ असणे : शत्रूला विधीवत् पराजित करून राज्यसंस्थापना करणे, ही निश्चितच साधी गोष्ट नाही. तसे पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही जगाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी देहलीत मोगलशाही, बिदरमध्ये बरीदशाही, गोवळकोंड्याची कुतूबशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही अशा ५ इस्लामी सत्ता भारतावर राज्य करत होत्या. या सत्तांना आपण सध्याच्या भाषेत ‘इस्लामिक स्टेट’ म्हणू शकतो. त्या सर्व सत्ता हिंदूंवर अत्याचार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदूंना कोणताही राजाश्रय नसतांनाही या ५ ‘इस्लामिक स्टेट’चा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्या’ची अर्थात् ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना केली.
१ आ. शिवरायांनी वेदमंत्रांच्या जयघोषात स्वतःचा राज्याभिषेक करवून घेणे आणि भाषा, चलन, मुद्रा अन् राजधानी ठरवणे : त्या काळी एखाद्या हिंदु राजाला स्वतःचा राज्याभिषेक करायचा म्हटला, तरी त्याला देहलीच्या बादशहाची अनुमती घ्यावी लागत असे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्देश ‘इस्लामिक स्टेट’ला संपवणे आणि त्याला नाकारणे, हा होता. त्यामुळे त्यांनी वेदमंत्रांच्या उच्चारांमध्ये विधीवत् आणि वंदनीय संतांच्या उपस्थितीत ६ जून १६७४ या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. त्या वेळी त्यांनी संस्कृत भाषेतील राज्यकारभारकोष व्यवहारामध्ये आणला. त्यांनी त्यांचे चलन ‘होन’ हे घोषित केले आणि ‘शिवमुद्रा’ स्थापित केली. राजधानी म्हणून रायगडची घोषणा करण्यात आली आणि राज्याला ‘हिंदवी स्वराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ असे घोषित केले.
२. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यासच राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटे आपोआप दूर होणार असणे
छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच तत्कालीन समस्या आपोआप दूर झाल्या. त्यांच्या जन्मापूर्वीही सध्याच्या काळाप्रमाणे हिंदु स्त्रियांचे शील सुरक्षित नव्हते. यवन सरदाराने प्रत्यक्ष जिजामातेच्या जाऊचे अपहरण केले होते. त्या वेळी मंदिरे भ्रष्ट केली जात होती. गोमातेच्या मानेवर कसायी कधी सुरा फिरवेल, याचा नेम नव्हता. महाराजांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होताच मंदिरे पाडणे बंद झाले. एवढेच नाही, तर मंदिरे पाडून बनवलेल्या मशिदींचे रूपांतर पूर्ववत् मंदिरांमध्ये झाले. मौन राहून आक्रंदन करणाऱ्या गोमाता आनंदित होऊन हंबरू लागल्या. महाराजांनीही ‘गोहत्या प्रतिबंधक विधेयक’ कधी मंत्रीमंडळामध्ये सादर केले नाही. दुर्दैवाने वर्ष १९४७ नंतर स्वतंत्र भारतामध्ये महाराजांचे हिंदु राष्ट्र अवतरित न झाल्यामुळे आज भारत जगातील ‘सर्वाधिक गोमांस निर्यात करणारा देश’ झाला आहे.
भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यामुळे आंतरिक समस्यांसमवेतच बाह्य समस्याही दूर होतील. या समस्यांमध्ये पाकिस्तान आणि चीन यांचे संभाव्य आक्रमणही आहे. एकदा हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, आपले शेजारीही (शत्रूराष्ट्रे) आपोआप सरळ होतील.
हिंदवी स्वराज्य शक्तीशाली असण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रूसंहाराचे तत्त्व होते. आदिलशाहची राजधानी असणाऱ्या विजापूरच्या रस्त्यावरून चालतांना ११ व्या वर्षी बाल शिवाजीने गोवध करणाऱ्या कसायाचे हात तोडण्यासाठी काढलेली तलवार पुन्हा कधीच म्यान केली नाही. हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजिंक्यत्वाचे रहस्य होते. हे रहस्य अधिकाधिक उलगडल्यासच छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण राहिलेले कार्य सध्याची किंवा येणारी पिढी पूर्ण करू शकेल.
३. सैनिक आणि शेतकरी यांचा पुत्रवत् सांभाळ करणारे छत्रपती शिवाजी महाराज !
आज आपल्याला महागाई दिसते; पण ‘महाराजांच्या शासनकाळात जनता महागाईमुळे त्रस्त होती’, असे कधी ऐकले आहे का ? याउलट आज सैनिक किंवा शेतकरी यांचे अमानवीय मृत्यू होत असतांनाही राजकारणी शांत बसतात. महाराजांना केवळ शेतकऱ्यांचे प्राणच नाही, तर त्यांनी पिकवलेली शेतीही मौल्यवान वाटायची. त्यांनी ‘शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही कुणी हात लावणार नाही’, अशी आज्ञा दिली होती. महाराजांनी शेतकऱ्यांसारखेच सैनिकांनाही सांभाळले होते. ते लढाईमध्ये घायाळ झालेल्या अनेक सैनिकांना सोन्याचे अलंकार देऊन सन्मानित करत होते. सध्या भारतात काय चालू आहे ? वर्ष २०१० मध्ये कारगील युद्धामध्ये वीरगती प्राप्त करणाऱ्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी ‘आदर्श’ सोसायटी स्थापन करण्यात आली होती; परंतु त्यातील एकही सदनिका (फ्लॅट) सैनिकांच्या विधवा पत्नीला देण्यात आली नाही. भ्रष्टासुरांनीच सर्व सदनिका हडपल्या.
४. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वयंभू स्वराज्याची निर्मिती करणे
भारतात राजकीय शिखरावर विराजमान झालेल्या राजपुरुषांची न्यूनता नाही. राजेशाही असो किंवा लोकशाही भारतीय इतिहासाने अगणित राजपुरुषांना पाहिले आहे. त्यातील ९० टक्के राजे किंवा आजच्या भाषेमध्ये लोकप्रतिनिधी त्यांच्या पित्याच्या गादीवर बसले; परंतु केवळ छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा निराळे होते. ते कुणाच्या गादीवर बसले नव्हते. ते स्वयंभू राज्याचे निर्माते होते. त्यामुळे समकालीन आणि उत्तरकालीन समाजाने मोठ्या श्रद्धेने छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रभु श्रीराम यांच्यासारख्या आराध्याच्या रूपात पाहिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे ‘आम्ही तुमचे मुक्तीदाता आणि संरक्षकही आहोत’, हे सांगण्याचा प्रयत्न होता. महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने औरंगजेबाच्या राजधानीत ‘हिंदु राज्या’चे आव्हान उभे केले. वर्ष १९४७ नंतरच्या शासनकर्त्यांनी कधीच त्यांच्या प्रजेचे रक्षण करण्यासंदर्भात प्रजेला आश्वस्त केले नाही. जर असे झाले असते, तर आज काश्मीरमधून हिंदूंचे, तमिळनाडूतून ब्राह्मणांचेही पलायन झाले नसते, तसेच ईशान्य भारतात धर्मांतर झाले नसते.
५. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य यांचा आदर्श समोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी देहलीच्या राजवटीचा इतिहास लिहिला. औरंगजेबाचा इतिहास लिहितांना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीमपराक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी पुढे जाऊन शिवचरित्राचा सारांश लिहिला. त्यात ते लिहितात, ‘हिंदु धर्म अमर आहे’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. ज्या धर्मात महाराजांसारखे वीरपुरुष जन्म घेतात, तो धर्म कितीही संकट आली, तरी नष्ट होऊ शकत नाही; म्हणून हिंदु धर्म अक्षयवटाप्रमाणे पुनःपुन्हा वृद्धींगत होईल.’
भारत पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे हिंदवी स्वराज्य यांचा आदर्श समोर ठेवून लक्ष्य गाठले पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधुनिक शासनकर्त्यांकडे हिंदु राष्ट्राची मागणी करावी लागेल. ‘मागितल्यानेच सर्व मिळते’, हे लक्षात ठेवा ! केवळ हिंदु राष्ट्राची मागणी करून न थांबता कर्मशील योगदान दिल्यासच भारतात हिंदु राष्ट्र साकार होईल.
– श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
संपादकीय भूमिकाभारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यामुळे देशातील आंतरिक समस्यांसमवेतच बाह्य समस्याही दूर होतील ! |