विविध विषयांतील जगाचे दायित्व घेतल्याचा आव आणणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयाला वाहिलेल्या विभागाने जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने ‘इकोसिस्टिम रिस्टोरेशन’ म्हणजे ‘परिसंस्थेचे (म्हणजेच पर्यावरणाचे) पुनरुज्जीवन करणे किंवा तिची हानी भरून काढणे’ हा विषय चर्चेला घेतला होता. ४९ वर्षांपासून जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जातो आणि त्यासाठी प्रतिवर्षी एखादी संकल्पना घेतली जाते. ‘इकोसिस्टिम’ ही संकल्पना वर्ष १९५३ मध्ये ए.जी. टॅनस्ले या शास्त्रज्ञाने प्रथम सांगितली. जंगल, वाळवंट, गवताळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश, तसेच समुद्र आणि अन्य जल येथे प्राणी, पक्षी, जिवाणू, वनस्पती आदींपासून बनलेली सजीव, तसेच दगड, भूमी आदींपासून बनलेली निर्जीव पर्यावरणव्यवस्था असते. वनस्पती या सूर्यप्रकाश म्हणजे ऊर्जा, पाणी आणि भूमीतील घटक यांपासून अन्न सिद्ध करतात. प्राणी त्यावर जगतात आणि तीच ऊर्जा निसर्गाला परत करतात. निसर्गातून मिळणारे अन्न, हवा आणि पाणी यांवर मानवाचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे रक्षण करायचे असेल, तर या निसर्गस्रोतांना त्यांच्या उत्कृष्ट दर्जासह टिकवणे आवश्यक आहे. आज नेमके निसर्गातून मिळणारे हे घटक अत्यंत दूषित झाल्याने ते मानवी जीवनावर मोठा दुष्परिणाम करत आहेत. तसेच त्यातील शुद्धता संपत चालल्याने ते न्यून होत आहेत, असेही आपण म्हणू शकतो. हे सारे जगाला आता चांगले लक्षात आले आहे. ‘आज जगभरामध्ये प्रति तीन सेकंदांनी एखाद्या फूटबॉलच्या मैदानाएवढे जंगल नष्ट होत आहे’, असे तज्ञ सांगतात. जंगल नष्ट होणे म्हणजे संबंधित वनस्पती, प्राणी, जल, तेथील भूमी, जिवाणू आदी सर्व नष्ट होणे, तसेच पाऊस नष्ट होणे. मानवी जीवन पावसावर म्हणजे अप्रत्यक्षरित्या जंगलावर अवलंबून आहे. जगभरातील एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ नष्ट झाली असून वर्ष २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. ही सूची मोठी आहे. पर्यावरणाची हानी टळली म्हणजे त्याचे संतुलन राखले गेले, तर मानवी जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. निसर्ग समृद्ध म्हणजे भरभरून देत असला, तर मानवाची आर्थिक, शारीरिक, मानसिक आदी विविध स्तरांवरची दुरवस्था संपून त्याचे जीवन समृद्ध होईल. तसेच पर्यावरण रक्षणाने (हवामानातील पालट रोखला जाऊन) विविध प्रजातींचे रक्षण होईल. ‘युनायटेड नेशन्स’च्या पर्यावरण रक्षण करणाऱ्या विभागाला हेच म्हणायचे आहे; परंतु ‘पर्यावरणावर नव्हे, तर विज्ञानावरच जगणाऱ्या सध्याच्या मानवाला खरोखरच पर्यावरण रक्षण करायचे आहे का ?’, असा प्रश्न कुणाला पडला, तर तो चुकीचा नव्हे. अगदी साधे उदाहरण घेतले, तर सतत गारव्यासाठी शहरी माणसे मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्रे वापरून पर्यावरणात प्रचंड उष्णता वाढवत आहेत; परंतु ‘पर्यावरणाची हानी करत आहोत’ म्हणून किती जणांची वातानुकूलित यंत्र वापरणे बंद करण्याची सिद्धता असणार आहे ? किंबहुना पर्यावरण रक्षणाच्या बैठका वातानुकूलित यंत्र बसवलेल्या खोल्यांविना पार पडू शकत नाहीत, अशी आजची स्थिती आहे.
पर्यावरण रक्षणाचे भारतियांचे प्रयत्न !
‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणाऱ्या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे. १२ सहस्रांहून अधिक काळ शेतीचा इतिहास असणारी आपली संस्कृती आहे, असे पुरावे मिळतात. सहस्रो वर्षे आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून, तसेच ‘निसर्गदेवो भव ।’ (निसर्गदेवतेला नमस्कार असो) या संस्कृतीमुळे आपले पर्यावरण उत्तमरित्या सांभाळले होते. जगात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि भारतात गेल्या ५० ते ७० वर्षांपासून निसर्गाची हानी मोठ्या प्रमाणावर होण्यास आरंभ झाला. आज जगभरातील ९० टक्के माती (रसायनांनी) दूषित झाली आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे जगभरात ४० टक्के अन्नाचे उत्पन्न न्यून झाले आहे. जगभरात विविध क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या जीवनविघातक रसायनांचा हा परिणाम आहे. पर्यावरण रक्षणासाठी रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्याचे मोदी शासन सध्या आवाहन करत आहे आणि दुसरीकडे नैसर्गिक शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. ‘नमामी गंगा’ अभियान, सौर ऊर्जेवर लक्ष्य केंद्रित करणे, देशभर चालवत असलेले स्वच्छतेचे अभियान, शून्य प्लास्टिक अभियान, इलेक्ट्रिक वाहने आणणे आदी अनेक उपक्रम निसर्गरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलणारे ठरले आहेत. केंद्रशासनाने मातीची सुपीकता टिकवण्यासाठी पाच स्तरांवर प्रयत्न करणे चालू केले आहे. मातीला रसायनमुक्त करणे, मातीतील जिवाणूंना वाचवणे, भूमीत जलाची उपलब्धता निर्माण करणे, वन वाचवणे, भूमीचा क्षय रोखणे. या सूत्रांनुसार शासनाने योजना बनवणे चालू केले आहे आणि देशाची कृषीनीती पालटली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मातीची पत समजून देणे आणि ती वाचवणे याचा एक प्रयत्न म्हणून आतापर्यंत शासनाने २२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याचे (सुपीकतेचे) प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे उत्पादन खर्च वाचणे आणि धान्याचे प्रमाण वाढणे असे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. निसर्गाकडे पहाण्याचा धार्मिक दृष्टीकोन असल्याने भारताला निसर्गरक्षण करणे सोपे आहे. भारताच्या स्तरावर विचार केला, तर ही सर्व स्थिती पालटण्यासाठी म्हणजेच निसर्ग पुन्हा निर्मळ आणि शुद्ध करण्यासाठी न्यूनतम २० ते २५ वर्षे विरुद्ध दिशेने नेटाने प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सामान्य नागरिकाची निसर्गाप्रती संवेदनशीलता किंवा भाव असेल, तरच ते साध्य होऊ शकते. साधना करणाऱ्या व्यक्तीत निसर्गातील गोष्टींविषयी ही संवेदनशीलता असल्याने तिच्याकडून सर्वाधिक चांगल्याप्रकारे पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न होऊ शकतात. सध्या होणारी पर्यावरणहानी ही येत्या आपत्काळाचे एक द्योतक आहे; परंतु तद्नंतर येणाऱ्या काळात मानवाला पुनश्च निसर्गाची पूजा करूनच स्वतःचा उत्कर्ष करावा लागणार आहे, हे निश्चित !
पर्यावरणाचे विविध स्तरांवर रक्षण करण्यासाठी मनुष्याची त्याच्याप्रती असलेली संवेदनशीलता वाढवणे आवश्यक ! |