अजित डोवाल यांच्यासंदर्भात केलेला दावा इराणकडून मागे !

नूपुर शर्मा प्रकरणी डोवाल यांनी संबंधितांना कठोर शिक्षा करण्याचे आश्‍वासन दिल्याचा इराणने केला होता दावा !

नवी देहली – नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांना कठेर शिक्षा दिली जाईल, त्यातून इतरांना धडा मिळेल’, असे म्हटल्याचे दावा इराणकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता; मात्र काही घंट्यांनंतरच इराणने हा दावा मागे घेतला. इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन हे भारत दौर्‍यावर आहेत. त्यांनी डोवाल यांची भेट घेतली होती. त्यात अब्दुल्लाहियन यांनी हा दावा केल्याचे या निवेदनात म्हटले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून हा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे.

याविषयी माहिती देतांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, ‘‘इराणचे परराष्ट्रमंत्री आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यातील भेटीच्या वेळी महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील विधानाचे सूत्र चर्चेत आले नाही. ‘हे मत भारत सरकारचे नाही’, असेही आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. पैगंबर यांच्याविषयी संबंधित टिप्पणी, तसेच ट्वीट करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. आमच्याकडे या विषयावर अतिरिक्त सांगण्यासारखे काही नाही. सध्या ज्या विषयी बोलले जात आहे, तो भाग इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनातून हटवला असल्याची माझी माहिती आहे.’’