‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (रमानंदअण्णा) यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनानंतर साधकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. कोरोनाच्या महामारीमुळे बिकट झालेल्या स्थितीमुळे आणि विस्कटलेल्या जनजीवनामुळे कोणालाही बाहेर जाता येत नव्हते. असे असूनही घरात राहून सतत सत्मध्ये रहाण्याच्या तळमळीमुळे साधकांनी विज्ञापनांची सेवा पूर्ण केली. जे ध्येय ठेवले होते, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘तळमळ आणि श्रद्धापूर्वक प्रयत्न केल्यास श्री गुरूंची कृपा आणि गुरुतत्त्व कसे कार्यरत होते ?’, याची प्रत्यक्ष अनुभूती या सेवेमुळे साधकांनी घेतली. (भाग १)
१. पू. रमानंदअण्णा यांनी सर्व साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करणे
कर्नाटक राज्यात वर्ष २०२० मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या कन्नड ग्रंथाची १ आवृत्ती आणि गुरुपौर्णिमेसंबंधी जिल्हास्तरीय १० विशेष स्मरणिका काढण्याचे नियोजन झाले होते. या कालावधीत ‘साधकांना आधार मिळावा आणि साधक अन् समाजातील व्यक्ती यांची साधना व्हावी’, यासाठी पू. रमानंदअण्णा यांनी सर्व जिल्ह्यांतील साधकांना एकत्र करून सर्वांसाठी एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन केले.
२. पू. अण्णांनी विज्ञापनांच्या सेवेविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन
२ अ. आपत्काळात स्थिर रहाण्यासाठी आपल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची गती वाढवायला हवी ! : ‘आपत्काळ कोणत्याही वेळी आणि कसाही येऊ दे, आपण स्थिर राहून साधना करायला हवी. आपण आपल्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची गती वाढवायला हवी. साधना हाच आपला आधार आहे. कोणतीही परिस्थिती आली, तरी आपल्या समवेत गुरुदेव आहेत. त्यामुळे नकारात्मक विचार आणि चिंता करायला नको. आपण सतत सत्मध्ये रहायला हवे. आपण गुरुसेवेपासून दूर रहायला नको. आपत्काळाविषयी अनेक वर्षांपासून गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी आपल्या मनाची सिद्धता करवून घेतली आहे.
२ आ. समाजातील सात्त्विक जिवांचा विज्ञापनांच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभाग करवून घेऊन त्यांची साधना करवून घ्यायला हवी ! : अशा स्थितीत आपली व्यष्टी आणि त्या समवेत समष्टी साधनाही व्हायला हवी. समाजात जे चांगले आणि सात्त्विक जीव आहेत, त्यांना साधना सांगून त्यांच्याकडून धर्मकार्यासाठी अर्पण करवून घेऊन त्या माध्यमातून त्यांची साधना करवून घ्यायला हवी. त्यासाठीची अमूल्य संधी, म्हणजे विज्ञापनांच्या माध्यमातून सर्वांचा धर्मकार्यात सहभाग करवून घेणे. श्रेष्ठ अशा गुरुकार्याला, धर्मकार्याला विज्ञापनांच्या माध्यमातून अर्पण दिल्याने समाजातील व्यक्तींच्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक अडचणी दूर होतात. त्यांचे प्रारब्ध, तसेच देवाण-घेवाण हिशोब अल्प होतात. साधना होऊन त्यांचेही रक्षण होते.
२ इ. समाजाकडून धर्मकार्यासाठी अर्पण करवून घेतांना साधकांना होणारे लाभ : आपण जेव्हा समाजातून विज्ञापन मागतो, तेव्हा आपल्यातील स्वभावदोष दूर होऊन गुणवृद्धी होते, आपल्याला सतत सत्मध्ये रहाता येते; तसेच आपले सेवेचे चिंतन वाढते.
२ ई. जिज्ञासूंशी कोणत्या विषयांवर बोलायला हवे ? : जिज्ञासूंच्या मनाच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांच्याशी बोलायला हवे. त्यांना ‘कोरोना महामारीच्या माध्यमातून आलेल्या संकटाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना’, असे विषय सांगायला हवेत, तसेच त्यांच्याशी साधनेविषयी बोलू शकतो.
२ उ. विज्ञापनदात्यांशी बोलतांना आपल्या मनात ‘आपल्या वाणीतून गुरुदेवांचे चैतन्यच कार्यरत होत आहे’, असा भाव असायला हवा.
३. पू. अण्णांनी साधकांना गुरुदेवांचे रूप आठवून ‘कोणाकडून विज्ञापन घेऊ शकतो ?’, त्या जिज्ञासूंची सूची सिद्ध करण्यास आणि त्यापुढे ध्येय लिहिण्यास सांगणे
पू. रमानंदअण्णांनी सर्व साधकांना ५ मिनिटे डोळे बंद करण्यास सांगितले. ‘गुरुदेव ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे रूप आहेत’, असा भाव ठेवून त्या रूपाला चरणांपासून मस्तकापर्यंत डोळे भरून पहाण्यास सांगितले. त्या वेळी ‘आपण कोणाकोणाकडून विज्ञापन घेऊ शकतो ?’, असा विचार करून ‘त्या वेळी कोणाकोणाची नावे डोळ्यांसमोर येतात ?’, ती नावे लिहून त्यापुढे ध्येयही लिहिण्यास सांगितले.
सर्वांनी वरील भावप्रयोग करून जी सूची काढली, ती उत्तरदायी साधकांना दिली. प्रत्येकाने आपापले ध्येय सांगितले.
४. पू. अण्णांच्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन त्यांचा उत्साह वाढणे
‘सेवा करतांना आपल्याला गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायचे आहे’, असे पू. अण्णांनी सांगितले होते. त्यामुळे साधकांच्या मनातील नकारात्मक विचार आणि निरुत्साह दूर झाला. कौटुंबिक आणि आध्यात्मिक अडचणींमुळे थकलेल्या साधकांना पू. अण्णांच्या चैतन्यदायी सत्संगाने संजीवनीप्रमाणे स्फूर्ती मिळाली. साधकांना होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होऊन त्यांना चैतन्याच्या स्तरावर लाभ झाला.
५. ‘गुरुकृपा, साधकांचे संघटित प्रयत्न, सेवेची तीव्र तळमळ’ यांमुळे साधकांनी विज्ञापनांच्या संदर्भात ठरवलेल्या ध्येयाची पूर्ती होणे
या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वांनी १ दिवसात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथासाठी विज्ञापने, ४ दिवसांत ‘सनातन पंचांगा’साठीची विज्ञापने आणि ६ दिवसांत विशेष स्मरणिकांची विज्ञापने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले. साधकांच्या प्रयत्नांमुळे एका दिवसात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाची विज्ञापने पूर्ण झाली, ३ दिवसांत उत्तर कर्नाटकमधील पंचांगाची विज्ञापने पूर्ण झाली; ९ दिवसांत दक्षिण कर्नाटकमधील पंचांगांची विज्ञापने, ५ जिल्ह्यांच्या विशेष स्मरणिकांची विज्ञापने आणि एका विशेषांकाची ७५ टक्के विज्ञापने पूर्ण झाली. सर्व साधकांचे संघटित प्रयत्न, सेवेची तीव्र तळमळ, संतांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा, यांमुळे गुरुकृपेने १० दिवसांत विज्ञापनांची सेवा पूर्ण झाली. यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी अनंत कोटीशः भावपूर्ण कृतज्ञता !’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/587085.html
– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सौ. पौर्णिमा प्रभु, कर्नाटक
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |