श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष यांच्यात वाद !
नाशिक – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी मंदिरामध्ये हुकूमशाही आणि मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत, असा आरोप देवस्थानच्या विश्वस्तांनी ८ जून या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दुसरीकडे ‘आपल्याला मारहाण करण्यात आली आहे’, अशी तक्रार त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांचे विशेष लेखापरीक्षक शुभम मंत्री यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. या आरोपांमुळे देवस्थानमधील अंतर्गत वाद मंदिराच्या इतिहासात प्रथमच चव्हाट्यावर आला आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी म्हणाले, ‘‘त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवरात भाविकांसाठी मंडप उभारणी करण्याची मागणी केली होती; मात्र अद्यापही यावर काम चालू झालेले नाही. याविषयी लेखापरीक्षक शुभम मंत्री यांच्याशी चर्चेच्या वेळी किरकोळ वाद झाला; परंतु देवस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. देवस्थानचे लेखापरीक्षक आम्हीच नेमले आहेत, तर मग आम्ही भ्रष्टाचार केला असता, तर लेखापरीक्षक का नेमले असते ?’’
१. देवस्थानचे विश्वस्त मंडळ म्हणाले की, देवस्थानातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि निविदा प्रक्रिया करतांना देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी हे मनमानी कारभार करत आहेत; मात्र त्यांच्या कारभारावर आवाज उठवल्यास ते आमच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्याची धमकी देत आहे. याविषयी विश्वस्तांनी तक्रार प्रविष्ट केली आहेत.
२. विश्वस्त मंडळाने सांगितले की, गेल्या काही मासांपासून न्यासासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे न्यासाच्या कार्यालयात नाहीत, तसेच बैठकीच्या इतिवृत्तानुसार विश्वस्तांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. न्यासाची चालू असलेली बांधकामे आणि त्या अनुषंगाने ठेकेदारांना देण्यात आलेली देयके याविषयीही विश्वस्तांना विश्वासात घेतले नाही. लेखापरीक्षक शुभम मंत्री यांच्या खात्यात देवस्थानच्या खात्यातून परस्पर लाखो रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणावर मंदिराचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने योग्य ठिकाणी भूमिका मांडू’, असे म्हटले आहे.
लेखापरीक्षक शुभम मंत्री म्हणाले की, एका विश्वस्ताने शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला. याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना दिले असून तक्रारही केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांच्या कोणत्याही व्यवहारात लेखापरीक्षकांचा कोणताही संबंध येत नाही. विश्वस्त मंडळाने ठराव करून माझी नियुक्ती केली आहे.