‘सूर्यनमस्कार’ निरोगी आयुष्यासाठी कल्पवृक्ष ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज

प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज

पुणे – देहली दरबाराने (आतापर्यंतच्या सरकारांनी) अनेक वर्षे ‘ल्यूटन्स दिल्ली’चे (कथित विचारवंत आणि बुद्धीजीवी यांचे) लाड केल्याने आयुर्वेदाला न्यून लेखले गेले; मात्र आता देहलीच्या सत्तेवर पात्र मंडळी असल्याने आयुर्वेदाला पुन्हा ‘अच्छे दिन’ येत आहेत. सूर्योपासना ही सर्व उपासनांच्या केंद्रस्थानी असून, ऐहिक जीवन जगतांना आत्मसिद्धीपर्यंत पोचण्याचे साधन आहे. व्यायाम, प्राणायाम, आसने आणि उपासना यांचा समावेश असलेला ‘सूर्यनमस्कार’ निरोगी आयुष्यासाठी कल्पवृक्ष आहे, असे मत श्रीरामजन्मभूमी न्यासाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज यांनी व्यक्त केले. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाच्या वतीने निखिल कुलकर्णी लिखित ‘सूर्योपासना-संपूर्ण आरोग्याची नांदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्यसभेचे माजी खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, लेखक निखिल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘काही राज्यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवण्याची घोषणा केल्यावर धर्मनिरपेक्षतेविषयी चिंताग्रस्त असलेल्या व्यक्तींनी काहूर माजवण्याचा प्रयत्न केला; परंतु सूर्योपासनेमुळे बिचकून जाण्याची आवश्यकता नाही. सूर्योपासना ही निसर्गाविषयी कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. या पुस्तकातून सूर्यनमस्काराची सर्वंकषता अधोरेखित होते.’’