नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या समाजवादी पक्षाच्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी !

लक्ष्मणपुरी – महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी भाजपमधून काढून टाकण्यात आलेल्या नूपुर शर्मा यांचे समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे नेते अंकुर यादव यांनी समर्थन केले. यामुळे समाजवादी पक्षाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

१. अंकुर यादव यांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित केली होती. त्यात त्यांनी ‘एखाद्या राजकीय पक्षाला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे, ही वेगळी गोष्ट झाली; मात्र नूपुर शर्मा यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. एवढेच नव्हे, तर हिंदूंनीही नूपुर शर्मा यांच्या मागे खंबीरपणे उभे रहायला हवे. आपल्या घरातील एखादी महिला जर अडचणीत असेल, तर तिला आपण एकट सोडू शकत नाही’, असे लिहिले होते.

२. यादव यांच्या या ‘पोस्ट’मुळे समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अंकुर यादव यांना पक्षातून काढून टाकण्याचा आदेश दिला. अंकुर यादव यांनी स्वतः त्यांना काढून टाकल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून पक्षातून काढून टाकल्याविषयी पक्षाचे आभार मानले आहेत. या पत्रात अंकुर यादव यांना का काढून टाकण्यात आले, याचे कारण मात्र नमूद करण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका

समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशात सत्तेवर असतांना तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी श्रीरामजन्मभूमीसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर गोळीबार करून त्यांना ठार मारले होते. त्यामुळे एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या महिला नेत्याचे पक्षाने समर्थन केलेले समाजवादी पक्षाच्या नेत्यांना कसे रूचेल ? हिंदूंनी या पक्षाचा हिंदुद्वेष लक्षात ठेवून त्याला मतपेटीद्वारे प्रत्युत्तर द्यावे !