५ घंटे पाण्यात उभे होते आंदोलक
बीड – जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून जाणार्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे करूनही यावर कारवाई होत नसल्याने आमदार पवार यांनी गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात उतरून ‘जलसमाधी आंदोलन’ केले. आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात गावातील महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनावेळी ग्रामस्थ ५ घंटे पाण्यात उभे होते. (कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
१. गेवराई तालुक्यातील गंगावाडी याठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीने वाळू घाटाला अनुमती देण्यात आलेली आहे; मात्र ज्या ठिकाणी हा वाळू घाट संपत आला, त्याऐवजी दुसर्याच ठिकाणावरून वाळू उपसा चालू असून वाळू ठेका मिळवण्यासाठी बनावट ठरावावर सरपंचांच्या स्वाक्षर्या असल्याचे आरोप करत गावकर्यांनी गावातच वाळू माफियांच्या विरोधात आमरण उपोषण चालू केले होते. २ दिवसांपूर्वी याच आंदोलकांची भेट घेऊन आमदार पवार यांनी हे उपोषण मागे घेण्यास सांगितले; मात्र २ दिवस उलटूनही प्रशासनाच्या वतीने या वाळू ठेक्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने आमदारच या आंदोलनामध्ये सहभागी झाले.
२. बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार पवार आणि ग्रामस्थ यांना समाधानकारक आश्वासन दिल्यानंतर हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून गंगावाडी येथे चालू असलेल्या वाळू ठेक्याची चौकशी करण्यासाठी १ समिती गठीत करण्यात आली आहे. गोदावरी नदीपात्रातून होणार्या अवैध वाळू उपशामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे.